जिवीत हानी झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? सत्तेवाडी मोरीची उंची वाढविण्याचे नागरिकांना केवळ आश्वासनच - चंदगड लाईव्ह न्युज

28 July 2023

जिवीत हानी झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? सत्तेवाडी मोरीची उंची वाढविण्याचे नागरिकांना केवळ आश्वासनच

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         अडकूर-कानूर मार्गावरील शिरोली सत्तेवाडी नजिकच्या मोरीची उंची वाढविण्याचे प्रवाशी व नागरिकांना आजपर्यंत केवळ आश्वासनच मिळत आहेत. पावसाळ्यात जरा जोराचा पाऊस आला की मोरीवर पाणी येत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन बायका मुलांना घेऊन या मोरीवरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे एखादा शेतकरी वाहून गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का असा संतप्त सवाल परिसरातील शेतकरी नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

      अडकूर, उत्साळी, अलबादेवी, शिरोली, सत्तेवाडी, कानडी, पोवाचीवाडी, म्हाळुंगे, इब्राहिमपूर, गवसे, कुरणी, बुझवडे, कानूर या गावांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. दरवर्षी पूर येतो आणि प्रत्येकवेळी पूराच्या पाण्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद होते. गवसे व कुरणीच्या पुलावर पाणी आल्यानंतर त्या विभागाला जोडणारा हा एकमेव मार्ग आहे. मात्र हा ओढा त्याला अडथळा ठरतो आहे. त्यामुळे या ओढ्यावरील मोरीची उंची वाढविणे गरजेचे आहे.

         याबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य तात्यासाहेब देसाई-शिरोलीकर यांनी प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी व प्रांताधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन ओढ्यावरील मोरीची उंची वाढविण्याचे आश्वासन दिले होते. पण ते आश्वासन हवेतच विरून गेल्याने बाव्याच्या ओढ्यावरील मोरीची प्रश्न ‘जैसे थे’आहे. प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले आहे. ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

No comments:

Post a Comment