ढोलगरवाडी येथील नागपंचमी उत्सव साध्या पद्धतीने...! केवळ शास्त्रीय माहिती मिळणार - चंदगड लाईव्ह न्युज

18 August 2023

ढोलगरवाडी येथील नागपंचमी उत्सव साध्या पद्धतीने...! केवळ शास्त्रीय माहिती मिळणार

संग्रहित छायाचित्र

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
   ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील मामासाहेब लाड विद्यालयात होणाऱ्या वार्षिक नागपंचमी उत्सवावर वन विभाग व झू अथोरिटी ऑफ इंडियाच्या जाचक अटींमुळे गंडांतर आले आहे. प्रत्यक्ष साप हाताळून न दाखवता येत नसल्याने केवळ शास्त्रीय माहिती व चित्र प्रदर्शनावर सर्प प्रेमींना समाधान मानावे लागणार आहे. अशी माहिती शेतकरी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष तानाजी वाघमारे, सर्पालय प्रमुख संदीप टक्केकर व प्रा. सदाशिव पाटील यांनी दिली आहे.
   आद्य सर्पमित्र बाबुराव टक्केकर यांनी सन १९६६ मध्ये ग्रामस्थ व अनेक लोकांचा विरोध झुगारून साप हे आपले मित्र आहेत हे सांगण्यासाठी ढोलगरवाडी येथे स्वतः संस्थापक असलेल्या शेतकरी शिक्षण मंडळ संचलित मामासाहेब लाड विद्यालयात सर्पशाळा सुरू केली. गेली ५६ वर्षे इथून हजारो विद्यार्थी सर्पमित्र म्हणून बाहेर पडले आहेत. दरवर्षी नागपंचमी व इतर वेळीही देशभरातून येणारे पर्यटक व सर्प प्रेमी नागरिकांचे सापां बद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी प्रबोधन करण्याचे कार्य अखंडपणे सुरू आहे. तथापि गेल्या चार-पाच वर्षात महाराष्ट्र वन विभाग तसेच 'झू' ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या (वन्यजीव संरक्षण विभाग)  जाचक अटी व शर्तीं पुढे शिक्षण संस्था हतबल ठरली आहे. पर्यावरण विषयक अत्यंत महत्त्वाचे प्रबोधन इतकी वर्ष करणाऱ्या संस्थेला महाराष्ट्र शासनाच्या उदासीन धोरणाचा फटका बसला आहे. इथे असलेल्या सापांना कोणतेच शासकीय अनुदान मिळत नाही. संस्थेच्या पर्यायाने सर्पोद्यानच्या  दुरावस्थेला संचालक मंडळातील अंतर्गत वादाचीही किनार असल्याची चर्चा पंचक्रोशीत होताना दिसत आहे. 
  या सर्व अडचणींवर मात करत संस्थेचे उपाध्यक्ष, काही संचालक व शिक्षक पदरमोड करून सर्प शाळा टिकवली आहे. येथून विषारी, बिनविषारी साप कसे ओळखावे, सर्पदंश झाल्यास प्रथमोपचार व पुढील उपचार, सापांबद्दलची अंधश्रद्धा व गैरसमज याबाबतचे प्रबोधन अखंडपणे चालू आहे. याचा उपयोग फायर ब्रिगेड, पोलीस, वनविभाग, वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, आर्मी, तसेच सर्प अभ्यासक व संशोधक यांना होत आहे.  या विद्यालयातून दरवर्षी बाहेर पडणारे शिकून बाहेर पडणारे दहावी व बारावीचे किमान १०० ते २०० विद्यार्थी सर्पविषयक प्रबोधनाचे कार्य जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन करत आहेत. परिसरात २५-३० किमी परिघात मानवी वस्तीत साप शिरल्यास रेस्क्यूचे काम सर्पमित्र प्रा सदाशिव पाटील, संदीप टक्केकर अहोरात्र करत असतात. या सर्व परिस्थितीचा विचार करता सर्प शाळेला झू अथॉरिटीच्या नियमानुसार पुरेशी जागा देण्याबरोबरच निधी पुरवठा करून हे केंद्र पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी शासनाच्या संबंधित विभागाने उदासीनता झटकून उभे राहावे. अशी मागणी गेली अनेक वर्ष उपाध्यक्ष तानाजी वाघमारे व त्यांचे सहकारी करत आहेत. यावेळी प्रकाश टक्केकर, संदीप टक्केकर, मुख्याध्यापक एन. जी. येळूरकर, सदाशिव पाटील, व्ही. आर. पाटील, एन. आर. पाटील, मधुकर बोकडे उपस्थित होते.
  एकंदरीत सोमवार दि. २१ ऑगस्ट २०२३ रोजी येणाऱ्या नागपंचमीला नाग व इतर अनेक जातींचे विषारी बिनविषारी साप प्रत्यक्ष पाहण्यास मिळणार नसल्याने पर्यावरण व सर्प प्रेमींमध्ये नाराजी पसरली असून त्यांना केवळ चित्र प्रदर्शन व माहितीवर समाधान मानावे लागणार आहे.
No comments:

Post a Comment