स्वातंत्र्यदिनी कोणत्या धबधब्याने दिली राष्ट्रध्वजाच्या रूपातून मानवंदना.....! - चंदगड लाईव्ह न्युज

16 August 2023

स्वातंत्र्यदिनी कोणत्या धबधब्याने दिली राष्ट्रध्वजाच्या रूपातून मानवंदना.....!

 

सुंडी धबधब्याने अशा प्रकारे तिरंगा राष्ट्रध्वजाच्या रूपात भारत मातेला व स्वातंत्र्य सैनिक, देशभक्त, क्रांतीकारकांना मानवंदना दिली.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
   नेहमी विविध कारणांनी चर्चेत असणारा सुंडी (ता. चंदगड) येथील वझर धबधबा ७६ व्या स्वातंत्र्यदिनी वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. या धबधब्याने स्वातंत्र्यदिनी चक्क तिरंगा राष्ट्रध्वजाच्या रूपात भारत माता, स्वातंत्र्य सैनिक, देशभक्त, क्रांतीकारकांना मानवंदना दिली.....! 
    काल १५ ऑगस्ट २०२३ रोजी गावातील काही उत्साही तरुण व पर्यटकांनी आपल्या कल्पनाशक्तीचा अविष्कार दाखवत ही किमया साधली. धो-धो कोसळणाऱ्या नयनरम्य धबधब्याच्या वरच्या अंगाला जाऊन तरुणांनी एका बाजूला भगवा तर दुसऱ्या बाजूला हिरवा रंग या पाण्याबरोबर ओतायला सुरुवात केली. आणि धबधब्याने चक्क तिरंगी ध्वजाचे रूप धारण केले. यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातून आलेल्या शेकडो पर्यटक व ग्रामस्थांनी भारत माता की जय, स्वातंत्र्य दिन चिरायू होवो अशा प्रकारे घोषणा देत हा निसर्गरम्य परिसर दणाणून सोडला.
   महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील श्री वैजनाथ डोंगर रांगांच्या उत्तर दिशेला महाराष्ट्र हद्दीत सुंडी चा वझर धबधबा गेली कित्येक वर्षे पर्यटकांना आकर्षित करून घेत आहे. धबधब्याकडे जाण्यासाठी बेळगाव, चंदगड व नेसरी कडून सुमारे २८ किलोमीटर अंतर आहे. धबधबा परिसरात नेहमी होणारी अतिउत्साही पर्यटकांची हुल्लडबाजी, अपघात, समाजकंटकांकडून महिला व कुटुंब वत्सल पर्यटकांना होणारा त्रास अशा घटनांमुळे चंदगड पोलिसांना तालुक्यातील किटवाड, तिलारी, सुंडी, स्वप्नवेल हे धबधबे डोकेदुखी ठरत आले आहेत. तथापि स्वातंत्र्यदिनानिमित्त काही तरुणांनी दाखवलेल्या कल्पनाशक्तीमुळे एक दिवस का असेना धबधबा परिसरातील वातावरण राष्ट्रभक्तीत न्हावून निघाले, असेच म्हणावे लागेल.


No comments:

Post a Comment