उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने काँग्रेसच्या पदयात्रेचे कोवाड येथे भव्य स्वागत - चंदगड लाईव्ह न्युज

04 September 2023

उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने काँग्रेसच्या पदयात्रेचे कोवाड येथे भव्य स्वागत

 

माजी मंत्री व राष्ट्रीय काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष यांचे जनसंवाद यात्रेदरम्यान कोवाड येथे स्वागत करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी

कालकंद्री : सी. एल. वृत्तसेवा
   राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने कोल्हापूरचे आमदार, माजी राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यात जनसंवाद यात्रेला  चंदगड तालुक्यातील तांबुळवाडी गावातून ३ सप्टेंबर २०२३ सुरूवात झाली. पहिल्या दिवशी तांबुळवाडी, बागिलगे, डुक्करवाडी (रामपूर), माणगाव, शिवणगे, म्हाळेवाडी, घुल्लेवाडी, निट्टूर, कोवाड अशी १४ किमी पदयात्रा काढण्यात आली. तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस सह शिवसेना (उद्धव ठाकरे) व राष्ट्रवादी (शरद पवार) आदी पक्षांच्या हजारो कार्यकर्त्यांसह तालुक्यातील नागरिकांनीही हजारोंच्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग घेऊन अभूतपूर्व प्रतिसाद दिला. 
     कोवाड येथे जनसंवाद यात्रेचे स्वागत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख लक्ष्मण मनवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर यांनी केले.
    जनसंवाद यात्रे दरम्यान कोवाड येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना खांडेकर म्हणाले "जालना येथे शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षणाची न्याय्य मागणी करणाऱ्या मराठा बांधवांवर पोलिसांकडून झालेल्या भ्याड मारहाणीचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला....! ही पदयात्रा नसून  जनभावना रस्त्यावर उतरली आहे. हे मिळणाऱ्या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळे सिद्ध झाले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र काम करायचे आहे असे आदेश दिल्याने आम्ही सर्व शिवसैनिक रस्त्यावर उतरलो आहोत. उद्धव साहेबांना फसवून सत्तेत बसलेले शिंदे सरकार खोटी आश्वासने देऊन लोकांची फसवणूक करत आहे. विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांना त्रास देणे सुरू आहे. पण शिंदे भाजप सरकारचे खरे रूप लोकांना कळून चुकले आहे. येत्या निवडणुकांमध्ये शिंदे, फडणवीस व त्यांच्या भ्रष्टाचारी मंत्र्यांना मतदार हद्दपार करतील असे खांडेकर यांनी सांगितले."
    यावेळी कोवाड शहरप्रमुख शिवप्रसाद अंगडी बोलताना म्हणाले "येत्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत मतदार गद्दारांना धडा शिकवेल व महाविकास आघाडीची सत्ता प्रचंड बहुमताने महाराष्ट्रात येईल."
     यावेळी कोवाड शाखाप्रमुख संतोष भोगन, उपतालुका प्रमुख विनोद पाटील आदींनी मनोगते व्यक्त केली. उपतालुकाप्रमुख रवींद्र पाटील (दुंडगे), शाखाप्रमुख मारुती पाटील (तेऊरवाडी), मारुती कांबळे (नागरदळे), परशराम मुरकुटे, संतोष आडाव, कोवाडचे माजी सरपंच मारुती भोगण आदी उपस्थित होते. संदीप पाटील यांनी आभार मानले.


No comments:

Post a Comment