कालकुंद्रीच्या योगेश जोशी याची भारतीय सेनादलात थेट 'लेफ्टनंट' पदी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

14 September 2023

कालकुंद्रीच्या योगेश जोशी याची भारतीय सेनादलात थेट 'लेफ्टनंट' पदी निवड

लेफ्टनंट पदी निवड झालेला योगेश उर्फ शुभम विठ्ठल जोशी 

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

   कालकुंद्री (ता. चंदगड) येथील योगेश उर्फ शुभम विठ्ठल जोशी याची नुकतीच भारतीय सैन्य दलात थेट लेफ्टनंट पदी निवड झाली आहे. संरक्षण क्षेत्रातील यूपीएससी (UPSC) परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई येथे एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करत या पदाला गवसणी घातली. त्याला चेन्नई येथे '4/3 GR रेजिमेंट' मध्ये नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. अधिकाऱ्यांचा गाव म्हणून अग्रेसर असलेल्या कालकुंद्री गावच्या शिरपेचात या निमित्ताने आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

आई, वडील व बहिणी सोबत योगेश

      २३ वर्षीय योगेश याचे मुळगाव कालकुंद्री असले तरी त्याचा जन्म पुणे येथे झाला. पहिली ते दहावीचे शिक्षण केंद्रीय स्कूल आयएटी गिरीनगर पुणे येथे झाले. तो इयत्ता दहावी परीक्षेत ९० टक्के गुणांनी उत्तीर्ण झाला. विज्ञान शाखेतून बारावी परीक्षेत त्याने ८५ टक्के मिळवले. १२ वी चे शिक्षण घेत नॅशनल डिफेन्स अकॅडमी (एनडीए) परीक्षा तसेच एस एस बी इनरव्हील मेडिकल परीक्षा पास केली होती. याचवेळी त्याला भारतीय नौदल व हवाई दलात अधिकारी म्हणून भरती होण्याची संधी होती. तथापि केवळ सेना दलातच जायचे या उद्देशाने तयारी सुरू ठेवली होती. बारावी नंतर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजमधून मे २०२२ मध्ये 'बी ई कम्प्युटर' परीक्षा चांगल्या गुणांनी पास होत असताना संरक्षण क्षेत्रातील UPSC परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला व त्यात यश मिळवले. 

       ऑक्टोबर २०२२ मध्ये ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई येथे प्रवेश घेतला व ९ सप्टेंबर २०२३ ला प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर नुकतीच इंडियन आर्मी मधील लेफ्टनंट पदाला गवसणी घातली. योगेश चे वडील विठ्ठल भीमा जोशी हे माजी सैनिक असून सेवानिवृत्तीनंतर तुटपुंजी जमीन असल्याने गावी न येता पुणे येथे दुसरी नोकरी पत्करली. चार मुलींच्या पाठीवर पाचवा मुलगा, अशा पाचही अपत्यांना उच्च विद्या विभूषित बनवले. योगेशच्या तिन बहिणी सध्या अमेरिकेतील वेगवेगळ्या विभागात उच्च पदावर कार्यरत असून एक बहीण पुणे येथे कम्प्युटर इंजिनियर आहे. एका मध्यमवर्गीय 'मराठा' कुटुंबातील या मुलांनी केवळ वडील विठ्ठल व गृहिणी असलेली आई सौ अंजना यांच्या प्रोत्साहनाच्या जोरावर प्रयत्नपूर्वक मिळवलेले हे देदीप्यमान यश चंदगड तालुक्यासह महाराष्ट्रातील सर्वच युवक युवतींना निश्चितच दिशादर्शक व प्रेरणादायी असेच आहे.

No comments:

Post a Comment