आरोग्य विभागामार्फत ''आयुष्यमान भव" मोहीमेचा शुभारंभ करताना मान्यवर.
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुका आरोग्य विभागाच्या वतीने १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत आयुष्यमान भव मोहीम आयोजित केलेली आहे, आरोग्य सेवा ही तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे व ती बळकट करणे हाच या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याची माहीती आरोग्य अधिकारी डॉ. बि. डी. सोमजाळ यांनी दिली.
''आयुष्यमान भव" मोहीमेचा शुभारंभ मोहिमेचे शुभारंभ गटविकास अधिकारी सुभाष सावंत, नायब तहसीलदार श्री. पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ यांच्यासह तालुका आरोग्य विभाग कडील सर्व कर्मचारी व उपस्थित लाभार्थी यांच्या समक्ष पंचायत समिती चंदगड येथे करण्यात आले.
या मोहिमेअंतर्गत सर्व नागरिकांचे आभा कार्ड काढणे, पात्र लाभार्थी यांचे आयुष्यमान गोल्डन कार्ड काढणे, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथील स्वच्छता मोहीम, ग्रामसभा आयोजित करून अवयव दान विषयी जनजागृती करणे, अठरा वर्षावरील सर्व पुरुष लाभार्थी यांची तपासणी करणे, अठरा वर्षापर्यंत सर्व शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करण्याचे काम केले जाणार आहे. या प्रसंगी क्षयरोग उपचार पूर्ण केलेल्या, आबा कार्ड काढलेल्या व आयुष्यमान गोल्डन कार्ड काढलेल्या काही लाभार्थी यांचा सत्कार करण्यात आला.
आरोग्य विभागामार्फत आयोजित सदरील मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन गटविकास अधिकारी सुभाष सावंत, नायब तहसीलदार श्री. पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment