कोवाड येथे सुलभ शौचालय बांधा, शिवसेनेची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

07 September 2023

कोवाड येथे सुलभ शौचालय बांधा, शिवसेनेची मागणी

ग्राम विकास अधिकारी दारुगडे यांच्याकडे मागणीचे निवेदन देताना शिवसेना तालुकाप्रमुख लक्ष्मण मनवाडकर व पदाधिकारी

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

       कोवाड (ता. चंदगड) येथील बाजारपेठ परिसरात सुलभ शौचालय व्हावे या मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आले. येत्या १५ दिवसात काम सुरु न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 

       कोवाड हे मोठे बाजारपेठेचे ठिकाण असून परिसरातील ३५ ते ४० गावातील लोकांचा रोज संपर्क असतो. दर गुरुवारचा आठवडी बाजार, प्राथमिक आरोग्य केंद्रासह सुमारे २५ ते ३० दवाखाने, एक महाविद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, केंद्रीय शाळेसह ४ प्राथमिक शाळेतील शेकडो विद्यार्थी, बाजारहाट करण्यासाठी येणारे हजारो नागरिक, रुग्ण, चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील दळणवळणाचे कोवाड हे प्रमुख केंद्र असल्यामुळे इथून नेसरी, गडहिंग्लज, चंदगड, बेळगाव, कामेवाडी, कुदनूर, ढोलगरवाडी अशा ५-६ मार्गावरून येजा करणारे हजारो प्रवासी यांची नेहमी वर्दळ असते.  

           आठवडी बाजार व अन्य वेळीही येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून ग्रामपंचायत करवसुली करत असते. मात्र व्यापारी व इतर लोकांसाठी सुविधांची वानवाच आहे. काही वर्षांपूर्वी नवीन पुलाजवळ बसवलेले फायबर शौचालय, मुतारी काही महिन्यातच मोडकळीस येऊन तसेच स्वच्छते अभावी बंद पडली आहे. सध्या बाहेरून आलेल्या महिला, मुली, विद्यार्थी व लोकांना ताम्रपर्णी नदीकाठी उघड्यावर शौचाला जाण्याची नामुष्की ओढवली आहे. ही परिस्थिती पाहता ग्रामपंचायतीने येथे शहरी पद्धतीचे सुलभ शौचालय व इतर सुविधा तात्काळ पुरवाव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

         या व्यतिरिक्त ग्रामपंचायतीला आमदार, खासदार व इतर फंड तसेच १४ व १५ व्या वित्त आयोगातून किती निधी मिळाला व त्याचा झालेला विनियोग याची सविस्तर माहिती द्यावी. अशीही स्वतंत्र निवेदनाद्वारे मागणी शिवसेना कोवाड शाखेच्या वतीने तालुका प्रमुख लक्ष्मण मनवाडकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास अधिकारी दोरूगडे  यांचेकडे करण्यात आली आहे.  येत्या १५-२० दिवसात शौचालय काम सुरु न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. 

       यावेळी उपतालुकाप्रमुख विनोद पाटील व रवींद्र पाटील, विभाग प्रमुख संदीप पाटील, कोवाड शाखाप्रमुख संतोष भोगण, शहरप्रमुख शिवप्रसाद अंगडी, मल्हार सेना महाराष्ट्र राज्य प्रवक्ता अमोल नाईक, शाखाप्रमुख परशराम मुरकुटे, अनिरुद्ध कुट्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment