दिल्लीच्या कृषी प्रदर्शनात चंदगडी भाषेत मांडले आपले विचार, रामपूरच्या शेतकऱ्याला दिल्लीच्या कृषी प्रदर्शनात सन्मान - चंदगड लाईव्ह न्युज

07 September 2023

दिल्लीच्या कृषी प्रदर्शनात चंदगडी भाषेत मांडले आपले विचार, रामपूरच्या शेतकऱ्याला दिल्लीच्या कृषी प्रदर्शनात सन्मान

 

गोपाळ राजाराम पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड तालुक्यातील रामपूर येथील गोपाळ राजाराम पाटील या शेतकऱ्याला दिल्लीच्या कृषी प्रदर्शनात चंदगडी शेतीच्या उत्पादनाबाबत मनोगत व्यक्त करण्याची संधी प्राप्त झाली. त्यांनी आपल्या चंदगडी भाषेत आपण केलेल्या शेतीतील प्रयोगाची मांडणी कृषी तज्ञांच्या समोर व्यक्त केली.

     कोल्हापूर जिल्ह्यात भात उत्पादनामध्ये सेंद्रिय शेती पद्धतीने दुसरा क्रमांक प्राप्त करून सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देत असताना इलाईट ग्रीन प्रायव्हेट लिमिटेड केरळ या कंपनीने नोएडा नॉलेज पार्क दिल्ली येथील कृषी प्रदर्शनात रामपूरच्या गोपाळ राजाराम पाटील यांना निमंत्रित केले आहे .दिनांक 6 ते 8 सप्टेंबर रोजी चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनात देशातील विविध राज्यात घेतल्या जाणाऱ्या सेंद्रिय शेतीच्या पद्धतीची माहिती मांडण्याची शेतकऱ्यांना संधी देण्यात आली आहे. चंदगड तालुक्यातील रामपूर मधील या शेतकऱ्याला या कृषी प्रदर्शनात आपण केलेल्या सेंद्रिय शेतीचा पद्धत आणि घेतल्या उत्पादनाबाबत मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. सेंद्रिय पद्धतीने भात ऊस व इतर पिके आदर्श पद्धतीने घेतली आहेत. 

     रामपूर ते दिल्ली असा विमान प्रवास करत हा शेतकरी आपल्या चंदगडी बोली भाषेत कृषी तज्ज्ञांच्या समोर आपले विचार मांडून अनेकांची वाहवा मिळवली. सध्याच्या शेती पद्धतीत सेंद्रिय शेतीला खूप महत्त्व आले असून पूरक आणि सकस आहार सेंद्रिय शेतीतून मिळवला जातो यासाठी सेंद्रिय शेतीचे महत्त्व खूप आरोग्यदायी असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले. चंदगडच्या भौगोलिक क्षेत्रात पडणारा पाऊस आणि मिळणारे उत्पादन यांची सांगड घालून सेंद्रिय शेती केल्यास उत्पादक क्षमता वाढण्यास मदत होईल असे त्यांनी यावेळी मत मांडले. अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण वाणिज्य मंत्रालय दिल्ली यांच्या वतीने या कृषी प्रदेशाचे आयोजन करण्यात आले आहे.No comments:

Post a Comment