सुभद्रा काबंळे |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड पंचायत समितीकडील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंता सुभद्रा लक्ष्मण कांबळे यांना जलजीवन मिशनचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून पंचवीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. गुरुवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. काल त्यांना गडहिंग्लज येथील जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली . तक्रारदार हे पोट ठेकेदार असून घुल्लेवाडी (ता. चंदगड) येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या सुधारीकरणाचे काम त्यांनी घेतले होते. त्याचे बारा लाख रुपये बिल मंजूर झाले होते. ते काढून देण्यासाठी कांबळे यांनी संबंधित ठेकेदाराकडे तीन टक्के दराने ३३ हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले. गुरुवारी पंचायत समिती कार्यालयातच त्यांनी ते स्वीकारत असताना लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संजीव बंबरगेकर, पोलिस कॉस्टेबल विकास सुनील माने, घोसाळकर, सचिन पाटील, पूनम विष्णू पाटील, गुरव यांच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. येथील पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातून कांबळे यांची तक्रारीनेच बदली झाली होती. सुरुवातीपासूनच त्यांनी आपली' वेगळी' भूमिका ठेवली होती. बेळगाव येथील हनुमान नगरमध्ये त्या भाडोत्री राहत होत्या. विविध गावातील पाणी योजनेच्या कामात अधिकारी म्हणून स्थानिक नागरिकांना विश्वासात घेण्याऐवजी आपल्या मतावर ठाम राहिल्याने वाद निर्माण झाले होते. त्यांच्या विभागातील कर्मचाऱ्यांना सुद्धा वेठीला धरल्याच्या तक्रारी होत्या. याच मुद्द्यावरून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून तक्रार नोंदवली होती. दरम्यान चंदगड तालुक्यातील आणखी दोन कार्यालयातील कर्मचारी लाचलुचपत च्या रडार शर असल्याची चर्चा आहे.
No comments:
Post a Comment