जंगमहट्टी येथील अष्टविनायक मंडळ ठरले गणराया ॲवार्ड २०२२ चा मानकरी, वाचा सविस्तर........ - चंदगड लाईव्ह न्युज

24 September 2023

जंगमहट्टी येथील अष्टविनायक मंडळ ठरले गणराया ॲवार्ड २०२२ चा मानकरी, वाचा सविस्तर........

पाटणे फाटा येथे तहसीलदार राजेश चव्हाण, पोलिस निरीक्षक संतोष घोळवे, प्रा. पी. डी. पाटील व मान्यवरांच्या हस्ते अष्टविनायक मंडळाला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.‌

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       साऊंड सिस्टीमच्या दुष्परिणामांमुळे अनेक व्याधींचा आजारांना निमंत्रण देण्यापेक्षा त्याचेच विसर्जन करून पारंपरिक वाद्यांच्या उपयोग करून विद्यायक गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन प्रा. पी. डी. पाटील यांनी केले.‌ शनिवारी पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे व्ही. के. चव्हाण-पाटील महाविद्यालयात चंदगड पोलिस ठाण्यांतर्गत आयोजित गणराया ॲवार्ड वितरण सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.‌ अध्यक्षस्थानी तहसीलदार राजेश चव्हाण होते. 

      प्रास्ताविक एम. व्ही. कानूरकर यांनी केले. पोलिस निरीक्षक संतोष घोळवे म्हणाले की, ``गणेशोत्सवाला गालबोट लागू नये. याची काळजी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी घ्यावयाची असून साऊंड सिस्टीमचा वापर करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.`` 

     त्यानंतर सर्वच पातळ्यांवर उत्कृष्ट ठरलेल्या जंगमहट्टी येथील अष्टविनायक गणेशोत्सव मंडळाला गणराया ॲवार्ड तर सर्वोत्कृष्ट उपक्रमशील मंडळ म्हणून जय कलमेश्वर गणेशोत्सव मंडळ किणीला मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.‌ तसेच एक गाव एक गणपतीमध्ये शिवशक्ती -करंजगाव, सिध्दीविनायक-रामपूर, जय हनुमान-कुर्तनवाडी तर सार्वजनिकमध्ये माणकेश्वर-माणगांव, अष्टविनायक-अडकूर, आदर्श-राजगोळी या मंडळांना सन्मानित करण्यात आले. 

       तसेच उपक्रमशील प्रकारात रवळनाथ-हलकर्णी, चंद्रसेन-चंदगड, छावा- म्हाळेवाडी, नवयुवक-सुंडी तर आकर्षक मूर्ती प्रकारात रवळनाथ-अडकूर, टिळक चौक -माणगांव, नवक्रांती- कुदनूर, शिवनेरी-मजरे कारवे यांना यश मिळाले. आकर्षक देखावा प्रकारात सार्वजनिक गणेशोत्सव-तुर्केवाडी, अष्टविनायक-सातवणे, अष्टविनायक- तडशिनहाळ, भावेश्वरी-नांदवडे यांना ॲवार्ड देण्यात आले. उत्कृष्ट मूर्तिकार म्हणून जंगमहट्टी येथील निवृत्ती शिंदे व मुरकुटेवाडी गावचे शंकर सुतार यांचा सत्कार करण्यात आला. 

        यावेळी प्रा. यू. डी. पाटील, सुनिल कोंडूस्कर, नारायण गडकरी, निवृत्ती हारकारे, विलास कागणकर, संतोष सुतार, महेश बसापुरे, तातोबा गावडा, शहानूर मुल्ला व मंडळाचे कार्यकर्ते, पोलीस पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. विलास नाईक यांनी केले तर निंगाप्पा बोकडे यांनी आभार मानले. 

No comments:

Post a Comment