मराठा आरक्षणप्रश्नी विशेष अधिवेशन बोलवा - आम. डॉ. विनय कोरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

31 October 2023

मराठा आरक्षणप्रश्नी विशेष अधिवेशन बोलवा - आम. डॉ. विनय कोरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


कोल्हापूर /प्रतिनिधी
     मराठा आरक्षण संदर्भात शासनाने  विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. आम. डॉ. कोरे आपल्या पत्रात म्हटलंय की, "गेल्या ४० वर्षांपासून मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा सुरुय. यामध्ये अनेक मराठा बांधवांनी बलिदान दिलंय. लाखो मराठा बांधवांचे शांतीपूर्ण मार्गाने एकूण ५७ मोर्चे निघाले आणि आता श्री. मनोज जरांगे-पाटील यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वसामान्य मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आपल्या समोर आलाय. 
     दुर्देवाने श्री मनोज जरांगे-पाटील यांनी सुरु केलेल्या शांततापूर्ण आंदोलनामध्ये लाठीचार्ज करणे आणि हे आंदोलन मोडून काढण्यासाठीची परिस्थिती निर्माण करणे याबाबत मराठा समाजामध्ये तिव्र असंतोष निर्माण झालाय. यानंतर शासनाने श्री. मनोज जरांगे-पाटील यांच्याकडून आरक्षणाच्या निर्णयासाठी ४० दिवसांचा कालावधी घेतला होता. 
     निर्णय प्रक्रियेतील दिरंगाईमुळे या कालावधीत शासन आरक्षणाचा निर्णय घेणेस असमर्थ ठरले. याची जाणिव शासनाला हा कालावधी मागून घेताना झाली नव्हती का? अशी भावना मराठा समाजामध्ये निर्माण झाली आणि पुनश्च: श्री. मनोज जरांगे- पाटील यांनी अन्न-पाणी त्यागाचं आंदोलन सुरु केले. या सगळ्यामध्ये त्यांच्या प्रकृतीची प्रचंड मोठी काळजी सर्वांनाच वाटत आहे. त्यांचे हे उपोषण संपवणेसाठी विशेष अधिवेशन बोलावून, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत एकमताने निर्णय घेवून त्यांच्या तब्बेतीला कोणताही धोका पोहोचू नये म्हणून हा निर्णय मनोज जरांगे-पाटील यांना कळवून, त्यांचे प्राणांतिक उपोषण ताबडतोब स्थगित करावे अशी माझी आपणांस विनंती आहे."


No comments:

Post a Comment