मराठी पत्रकार परिषद जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांच्या बैठकीत विविध विषयांवर झाले विचारमंथन - चंदगड लाईव्ह न्युज

09 October 2023

मराठी पत्रकार परिषद जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांच्या बैठकीत विविध विषयांवर झाले विचारमंथन

 


मुंबई / प्रतिनिधी

          'मराठी पत्रकार परिषद ही देशातील एकमेव अशी संघटना आहे, ज्यामध्ये दैनिक, साप्ताहिक, डिजिटल न्यूज पोर्टल तसेच युट्युब न्यूज चॅनलच्या पत्रकारांचा ही समावेश आहे. परिषदेने पत्रकारांमध्ये कधीही भेदभाव केला नाही. कारण आपला लढा पत्रकारांच्या हक्कासाठी, स्वातंत्र्यासाठी सुरू आहे. पूर्वीपासून परिषद ही पत्रकारांच्या प्रश्नावर, हक्कावर, पत्रकारांच्या संरक्षणच्या मुद्द्यावर लढत आली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून साप्ताहिकांच्या पत्रकारांना जाणून-बुजून बदनाम करण्याचे षडयंत्र काहीजण करत आहेत. साप्ताहिकांच्या पत्रकारांना अधिस्वीकृती मिळू नये, यासाठी काहीजण प्रयत्न करताना दिसतात. मात्र साप्ताहिकांमध्ये काम करणाऱ्या पत्रकाराला सुद्धा अधिस्वीकृती मिळावी, यासाठी मराठी पत्रकार परिषद पुढाकार घेत असून साप्ताहिकांच्या हक्कासाठी आपला लढा सुरू राहणारच,' असे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी स्पष्ट केले. 'साप्ताहिकांच्या पत्रकारांचे प्रश्न वेगळे असून त्यावर चर्चा करण्यासाठी लवकरच राज्यभरातील साप्ताहिकांच्या पत्रकारांचा मेळावा घेतला जाईल,' असेही ते म्हणाले.

      मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांची ऑनलाईन बैठक झाली. राज्यातील ३५ जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांपैकी ३० जिल्ह्यातील प्रतिनिधी बैठकीस हजर होते. या बैठकीत मार्गदर्शन करताना देशमुख बोलत होते. येत्या ३ डिसेंबर रोजी मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात येणार असून यानिमित्त राज्यभर आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये राज्यातील दहा ते पंधरा हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी होईल, यादृष्टीने नियोजन सुरू असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली.

      बैठकीला विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, परिषदेच्या डिझिटल शाखेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे, राज्याचे प्रसिध्दी प्रमुख संदीप कुलकर्णी, सहाय्यक प्रसिद्धी प्रमुख भारत निगडे, भाऊसाहेब सकट (जि.कोल्हापूर), दिपक शिंदे (जि.सातारा), प्रकाश आरोटे (अहमदनगर उत्तर), गजानन वाघ (वाशीम), विजय घरत (जि.पालघर), कमलेश ठाकूर ( जि.रायगड ) , जमिर खलपे (जि. रत्नागीरी), गोपीभाऊ लांडगे (धुळे), संजय हांगे ( बीड ), सुनील वाघमारे (छत्रपती संभाजीनगर) , सुभाष राऊत (नागपूर ), यशवंत थोटे ( गोंदीया ), राम साळुंके (लातूर), बबलू दोडके (अमरावती) आदी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख होते.

       याप्रसंगी एस. एम. देशमुख म्हणाले,'सर्व पत्रकारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी सातत्याने आपला मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पत्रव्यवहार सुरू असतो. गेल्या काही दिवसात पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यात वाढ झाली आहे. यावर आपण सातत्याने आंदोलने तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवत असतो.आपली सुरू असलेली वेगवान चळवळ रोखण्यासाठी जाणीवपूर्वक काहीजण प्रयत्न करतात. मात्र आपल्याला ग्रामीण भागातील पत्रकारांपर्येंत पोहोचण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी सोशल मीडिया हा सर्वात उत्कृष्ट असा प्लॅटफॉर्म आहे. सोशल मीडियावर सर्व जिल्हाप्रसिद्धीप्रमुखांनी ऍक्टिव्ह राहण्याची आवश्यकता असून एक दबाव गट निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे,' असे सांगतानाच देशमुख पुढे म्हणाले, 'आगामीकाळ निवडणुकीचा असून या काळात पत्रकार व राजकीय मंडळी यांच्यातील संघर्ष वाढत जाईल. अशावेळी आपल्याला सावध राहण्याची आवश्यकता आहे. सत्तेच्या विरोधात बोलणाऱ्या पत्रकारांना वाईट अनुभव येताना दिसतात. पत्रकारांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या सदस्यांनी ऍक्टिव्ह राहण्याची आवश्यकता आहे. तसेच ज्या जिल्ह्यात अद्याप पत्रकार हल्लाविरोधी कृती समिती तयार झाली नाही, त्या जिल्ह्यातून तत्काळ या समितीच्या सदस्य पदासाठी जिल्ह्यातील पत्रकारांचे नाव देणे गरजेचे आहे.'

       यावेळी विश्वस्त किरण नाईक यांनी सांगितले की, 'मराठी पत्रकार परिषदेचे आतापर्यंतची वाटचाल ही खूपच महत्त्वपूर्ण आहे. राज्यभरातील प्रसिध्दी प्रमुख हे परिषदेचे कान व डोळे आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याची राज्यपातळीवर नोंद घेतली जात असते. जिल्हा प्रसिद्ध प्रमुख म्हणून तुम्ही परिषदेचे कामकाज, हे गाव पातळीवर पोहोचवण्यासाठी जे प्रयत्न करता ते कौतुकास्पद आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्याला मदत करण्यासाठी परिषदेचे राज्यातील प्रत्येक पदाधिकारी कटिबद्ध असून तुम्हाला जेव्हा मदतीची गरज लागेल, तेव्हा आवर्जून हाक द्या.'

         बैठकीत प्रास्ताविक करताना अध्यक्ष शरद पाबळे यांनी मागील जिल्हा प्रसिद्धी प्रमुख यांच्या बैठकीचा आढावा सांगितला. तसेच लवकरच राज्यातील सर्व साप्ताहिकांच्या पत्रकारांचा एक मेळावा घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. आगामी काळात जिल्हाप्रसिद्धीप्रमुखांच्या कामाला गती मिळावी यासाठी प्रत्येक महिन्याला मीटिंग आयोजित करण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी दिल्या.  

      परिषदेचे सरचिटणीस मन्सूरभाई शेख यांनी पत्रकारांना रेल्वे प्रवासात सवलत मिळावी, यासाठी मराठी पत्रकार परिषदेकडून सुरू असणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली. या विषयावर नुकतेच केंद्रीय रेल्वेमंत्री यांना निवेदन पाठवले असल्याचेही त्यांनी सांगितले.तसेच हा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या सूचनेनुसार एक टीम कार्यरत करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली. राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी यांनी आभार मानले.


No comments:

Post a Comment