चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात "वाचन प्रेरणा दिन" संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

16 October 2023

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात "वाचन प्रेरणा दिन" संपन्नचंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       ग्रंथ हे भावना व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम आहे, ग्रंथ वाचनातून समाजातील विविध गोष्टींचे ज्ञान, ऐतिहासिक पुरावे, निसर्ग संपन्नता, साहित्यिक, कला, क्रीडा, इतिहास, खेळ व विविध कौशल्यांचे विस्तृत ज्ञान आत्मसात  करता येते. असे प्रतिपादन ग्रंथपाल प्रा. रा. सु. गडकरी यांनी व्यक्त केले. ते चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित वाचन प्रेरणा दिन व विक्रेता दिन समारंभात बोलत होते. प्रारंभी प्रकल्प अधिकारी व कोल्हापुर जिल्हा समन्वयक डॉ. संजय पाटील यांनी कार्यक्रमाची रूपरेखा सांगून प्रस्ताविक केले. डॉ. कलाम यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. 

        डॉक्टर ए. पी. जे.अब्दुल कलाम कलाम यांचे जीवन अत्यंत हालाकीचे व संघर्षमय होते. त्यांची  वर्तमानपत्र विक्रेता, मिसाईल मॅन ते देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदापर्यंतची मजल प्रत्येकासाठी  प्रेरणास्त्रोत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव त्यांनी समाजाला करून दिली. त्यांच्या साहित्यातून मानवी जीवनाचे असंख्य कंगोरे समजावून घेता येतात. वाचन प्रेरणा दिन हा साहित्य वाचनाविषयीची आवड निर्माण करण्यासाठीच साजरा केला जातो. विद्यार्थ्यांनी यातून बोध घ्यावा, श्रमाची किंमत जाणावी व समाजसेवेच्या माध्यमातून आपले व्यक्तिमत्व घडवावे. असे प्रतिपादन अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डाॅ. पी. आर. पाटील यांनी व्यक्त केले. स्वयंसेवकांनी श्रमदानाच्या माध्यमातून महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर स्वच्छ केला. प्लास्टिकमुक्ती अभियान राबविले.

      यावेळी प्रा. ए. डी. कांबळे, शिवराज हासुरे, पी. जी. कांबळे इतर स्टाफ व स्वयंसेवक उपस्थित होते. अंकिता तराळ हिने सुत्रसंचालन केले. तर पूजा तराळ हिने आभार मानले.

No comments:

Post a Comment