तिलारी घाटात अवजड वाहनांची वाहतूक रोखण्यासाठी तिलारीनगर येथील पोलिस चौकी पुन्हा सुरू करावी, नागरीकांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

16 October 2023

तिलारी घाटात अवजड वाहनांची वाहतूक रोखण्यासाठी तिलारीनगर येथील पोलिस चौकी पुन्हा सुरू करावी, नागरीकांची मागणी

संग्रहित छायाचित्र

नंदकुमार ढेरे / चंदगड - सी. एल. वृत्तसेवा 

          गोवा-दोडामार्ग-कोल्हापूर-बेळगाव जवळचा मार्ग असलेल्या तिलारी घाटातून अवजड वाहनांची वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. या वाहतुकीमुळे अनेक वेळा अपघात होऊन वाहतुकीची कोंडी होत असल्याने या घाटातील वाहतूक रोखण्यासाठी तिलारीनगर येथील पोलिस चौकी पुर्ववत सुरू करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

        या घाटातून मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्यात ये-जा करण्यासाठी या मार्गाची निवड करतात. पण या संधीचा फायदा घेऊन काही अवजड वाहने तिलारी घाटात अवजड वाहने बंदी असतानाही गोवा येथे जाण्यासाठी या घाटातून ये जा करतात. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून तिलारी घाटात अवजड वाहनांमुळे अपघात होणे वाहने अडकून पडणे अशा घटना वाढत चालल्या आहेत. तेव्हा अवजड वाहने रोखण्यासाठी तिलारीनगर नगर या ठिकाणी काही वर्षांपूर्वी सुरू असलेली पोलिस चौकी चंदगड पोलिस निरीक्षक यांनी कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षक यांची परवानगी घेऊन पुन्हा सुरू करावी अशी मागणी नागरीक करत आहेत.

        गोवा राज्यात जाण्यासाठी जवळचा तसेच सुरक्षित घाट रस्ता म्हणून आज तिलारी घाटाचा वापर केला जात आहे. चंदगड-कोल्हापूर-बेळगाव येथे जाण्यासाठी हा रस्ता चांगला आहे. चोर्ला घाट-बेळगाव रस्ता धोकादायक बनला आहे. आंबोलीचे अंतर अधिक होते. त्यामुळे जवळचा मार्ग म्हणून तिलारी घाट रस्त्याला पसंती दिली जाते. विविध राज्यांतील शेकडो पर्यटक वाहने घेऊन  तिलारी घाटातून ये-जा करतात त्यामुळे वर्दळ वाढली आहे.

      संभाव्य घाटातील धोकादायक चढ उतार वळणे काही ठिकाणी अरूंद घाट रस्ता वन विभाग कडून रूंदीकरण करण्यास असलेले निर्बंध. तसेच घाटातून जलविद्युत निर्मिती केंद्र विजघर यासाठी गेलेले पाणी, तिलारी घाटातून बोगदा खोदून नेले आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन अवजड वाहने बंदी घातली आहे. पण याचे उल्लंघन केले जात आहे.

   तिलारी घाटात अवजड वाहने ये-जा करतात. अवजड वाहने रोखण्यासाठी मोटणवाडी किंवा तिलारीनगर या ठिकाणी पोलिस चौकी चेकपोस्ट होणे गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी जलसंपदा विभाग यांचे काम सुरू असताना तिलारीनगर येथे पोलिस चौकी चेकपोस्ट होते. या ठिकाणी पोलिस कर्मचारी नेमणूक केली होती. पण तेव्हा आता सारखी वाहतूक नव्हती. घाटातील रस्ता सुरक्षित नव्हता. हा घाट रस्ता जलसंपदा विभाग यांच्या वाहनांसाठी काढला होता. खाजगी वाहने यासाठी नव्हता. पण कालांतराने या घाटातून घाटमाथ्यावर वाहतूक वाढली.

    काही वर्षांपूर्वी या घाटातील रस्ता शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या पुढाकाराने तो सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर चंदगड यांच्या ताब्यात दिला. त्यामुळे घाट रस्ता वाहतुकीसाठी योग्य करण्यात आला. पण वाढती अवजड वाहने यामुळे अनेक प्रवाशांची वाहने अडकून गैरसोय होत आहे. तेव्हा चंदगड पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांनी याकडे लक्ष घालून तिलारी घाटातील अवजड वाहने रोखण्यासाठी तिलारीनगर या ठिकाणी पोलिस चौकी चेकपोस्ट पुन्हा सुरू करावे. जेणेकरून इतर अवैध धंदे यांना आळा बसेल. अशी मागणी नागरिक करत आहेत.

No comments:

Post a Comment