तेऊरवाडीचे अध्यात्मीक गुरु भरमू भिंगुडे यांचे निधन, तेऊरवाडीवर शोककळा - चंदगड लाईव्ह न्युज

17 October 2023

तेऊरवाडीचे अध्यात्मीक गुरु भरमू भिंगुडे यांचे निधन, तेऊरवाडीवर शोककळा

भरमू भिंगुडे 

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         गेली अनेक दशके  तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असणारे ह भ प भरमू विठोबा भिंगुडे (वय ८८ वर्षे) यांचे आज मंगळवार दि १७ ऑक्टोबर रोजी आकस्मित  निधन झाले अन् संपूर्ण तेऊरवाडी गाव शोकसागरात बुडाला.

        भरमू भिंगुडे बुवा म्हणून गावासह कर्यात भागाला परिचित होते. केवळ एक वारकरीच नव्हे तर एक उत्तम किर्तनकार म्हणूनही प्रसिद्ध होते. गावातील कोणाचेही अध्यात्माचे कार्य असू देत. भरमू महाराजांना हक्काने घरचा माणूस म्हणून आमंत्रण दिले जायचे. भरमू  महाराज पण आपलेच कार्य समजून तन  मन अन धन अर्पण करून  ते कार्य पूर्णत्वास नेत असत. सत्य नारायण पूजा मांडण्याची त्यांची पद्धत अनं पूजेमध्ये  त्यानी सांगीतलेल्या गोष्टी ऐकतांना भाविक भक्त तल्लीन होऊन जात असत. गरीबांचे भटजी म्हणूनही त्यांची प्रचंड ख्याती होती. कोणतेही धार्मिक कार्य करताना कधीच त्यांनी मानधनाची अपेक्षा ठेवली नाही. पूजा मांडणी नंतर मिळणारी दक्षणा कधीच पूर्णपणे घरापर्यंत पोहचवली नाही. रस्त्यात भेटणाऱ्या मुलांना दक्षिणेत मिळणारी सर्व फळे ते वाटून संपवत असत. 

       गावचा सार्वजनिक सप्ता गेली अनेक दशके त्यांचा अधिष्ठानाखाली चालत होता. उभ्या आयुष्यात एक संत म्हणून, उत्कृष्ठ महाराज म्हणून कार्य करताना कोणावरही रागावल्या चे कोणाला आठवत नाही. सर्व समाजाला सामावून घेत सर्व गावाला आध्यात्मिक मार्गदशन करणारे भरमू भिंगुडे हे तेऊरवाडीचे आध्यात्मिक गुरूच होते त्यांच्या आकस्मित जाण्याने तेऊरवाडी गावचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. अशा या आध्यात्मिक गुरुवर बुधवार दि १८ रोजी सकाळी ९ वाजता तेऊरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment