बेळगाव-वेगुर्ला रोडवर कोनेवाडी फाट्यावर झालेल्या अपघातात प्राध्यापकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी - चंदगड लाईव्ह न्युज

26 October 2023

बेळगाव-वेगुर्ला रोडवर कोनेवाडी फाट्यावर झालेल्या अपघातात प्राध्यापकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

 

प्रा. सतीश सिताराम शिंदे 

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        चारचाकी कारने बेळगाव - वेंगुर्ला मार्गावर कोनेवाडी (ता. चंदगड) फाट्यानजीक दोन दुचाकींना उडवले. यामध्ये चंदगड येथील श्री रवळनाथ ज्यूनिअर कॉलेज चंदगड येथे अध्यापन करणारे प्रा. सतीश सिताराम शिंदे (मुळ गाव कोनेवाडी, सद्या रा. यशवंतनगर, ता. चंदगड)  यांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य एकजण या अपघातात गंभीर जखमी झाला आहे.

अपघातग्रस्त चारचाकी गाडी

       चंदगड पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, हिरो होंडा स्लेंडर मोटरसायकल वरून चंदगड येथील कॉलेजकडे सिताराम शिंदे हे सकाळी ७.३० वाजता जात होते. त्याचवेळी  हुंडाई ओरा कंपनीची चारचाकी गाडी जात होती. यावेळी स्वप्नील सुनिल चांदन (वय २३  वर्ष, रा. संत ज्ञानेश्वर, नगर थेरगाव जि. पूणे) याचा अती वेगाने वाहनावरील ताबा सुटल्याने चूकीच्या बाजूने जाऊन होंडा ड्रिम युगा मोटर सायकल व  हिरो होंडा स्प्लेंडर मोटर सायकल  या दोन दूचाकींना समोरून ठोकरले. 

अपघातग्रस्त दुचाकी

         यामध्ये प्रा. सतिश शिंदे यांच्या डोकीस तसेच छातीस मार लागून त्यांचा जागीच मृत्यु झाला. तर पारस सुरेश निर्मळकर यांचे डोकीस तसेच डावे हात फ्रेंक्चर झाल्याने गंभीर जखमी झाला. यासंदर्भात चंदगड पोलिसात संजय अर्जुन शिंदे (रा. कोनेवाडी) यांनी फिर्याद दिली असून आरोपी विरोधात चंदगड पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेचा अधिक तपास पोसई श्री. थिविले करत आहे. 

प्रा. सतिश शिंदे यांच्या वर यशवंत नगर येथे अंत्यसंस्कार 

       अत्यंत साधी राहणी, मनमिळावू असणारे प्रा सतीश इंग्रजी विषयाचे अध्यापन करत होते. त्यांच्या आकस्मित मृत्यूने  सर्व विद्यार्थी व शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का बसला. दुपारी यशवंतनगर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, भाऊ पत्नी व ४ वर्षांची एक मुलगी असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment