मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी! उद्या चंदगड तालुक्यातील सर्व गावांत विशेष ग्रामसभेत होणार 'मतदार यादीचे वाचन' - चंदगड लाईव्ह न्युज

01 November 2023

मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी! उद्या चंदगड तालुक्यातील सर्व गावांत विशेष ग्रामसभेत होणार 'मतदार यादीचे वाचन'कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
    चंदगड तालुक्यातील प्रत्येक गावात गाव पातळीवर गुरुवार दिनांक २ नोव्हेंबर २०२३ रोजी विशेष ग्रामसभा सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रामसभेत नवीन मतदार यादीचे वाचन करण्यात येणार असून येत्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने मतदार यादी त्रुटीविरहित करण्याचे नियोजन मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात आले आहे. 
    त्यानुसार २७१ चंदगड विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या चंदगड तालुक्यातील सर्व गावातील सुमारे २०० मतदान केंद्रातील मतदार याद्यांचे वाचन केले जाणार आहे. अशी माहिती तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी राजेश चव्हाण तसेच निवासी नायब तहसीलदार हेमंत कामत व निवडणूक महसूल सहाय्यक अमर साळुंखे यांनी दिली आहे. 
    तालुक्यातील मतदारांनी आपले नाव यादीत आहे की नाही...? याची खात्री करून घ्यावी. काही गावातील मतदारांची नावे चुकून वगळणी झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यांनाही आपले नाव पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्याची संधी मिळणार आहे. मयत मतदारांची नाव वगळणे त्याचबरोबर मतदार यादीतील चुकीची नावे दुरुस्त करणे, नवीन नोंद करणे याबाबत सर्व मतदान केंद्रावर बीएलओ तथा केंद्रस्तरीय मतदान अधिकारी माहिती देणार आहेत. तरी नागरिकांनी उद्या होणाऱ्या ग्रामसभेवेळी उपस्थित राहून आपल्या नावाची नोंद योग्य रीतीने मतदार यादीत आहे की नाही! याची खात्री करून घ्यावी व दुरुस्ती तसेच नवीन नाव नोंदणीच्या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन राजेश चव्हाण तहसीलदार चंदगड यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment