वन्य प्राणी विरुद्ध शेतकरी संघर्ष संपवून झालेली नुकसान भरपाई तात्काळ द्या...! उबाठा शिवसेनेची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

20 November 2023

वन्य प्राणी विरुद्ध शेतकरी संघर्ष संपवून झालेली नुकसान भरपाई तात्काळ द्या...! उबाठा शिवसेनेची मागणी

तहसीलदार चंदगड यांना निवेदन देताना चंदगड तालुका 'उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे' पदाधिकारी.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          गेल्या काही वर्षांत चंदगड तालुक्यात वन्य प्राणी आणि शेतकरी यांचा संघर्ष सुरू आहे. यात हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याबरोबरच अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले असून कित्येकांना गंभीर दुखापतीमुळे कायमचे अपंगत्व आले आहे. तथापि वन विभाग या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही, हे लक्षात आल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या प्रश्नी उपवनसंरक्षक, तहसीलदार चंदगड व संबंधित विभागांना वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याबरोबरच यापूर्वी झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

        निवेदनात मागण्यांबरोबरच उपायही सुचवण्यात आले आहेत. यात जंगली प्राणी व शेतकरी संघर्ष कायमचा संपवण्यासाठी ठोस उपाययोजना हाती घ्याव्यात. त्यासाठी जंगलांचे समृद्धीकरण करणे बांबू, अकेशिया, निलगिरी, सुबाभूळ सारख्या झाडांची लागवड थांबवून पारंपारिक वृक्षांची लागवड करावी. पर्यावरण आणि जैव विविधतेला बाधा आणणारी झाडे काढून टाकावी. जंगलातील पाण्याचे स्त्रोत जिवंत करण्याबरोबरच जंगली जनावरांना पिण्यासाठी जंगलातच पाणी उपलब्ध करावे, यासाठी वनतळी तयार करावी. 

        'झाडे लावा झाडे जगवा' हा कार्यक्रम स्तुत्य असला तरी तो कुठे राबवावा याचे भान वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाने ठेवावे. पूर्वी जंगलांमध्ये चरावू क्षेत्र असल्याने सांबर, गवे, भेकर, आदी प्राण्यांना चारा उपलब्ध व्हायचा, तथापि वन विभागाने अविचाराने रिकाम्या, गवताळ जागेवर झाडे लावून वन्य प्राण्यांच्या पोटाचा प्रश्न गंभीर करून ठेवला आहे. वृक्षारोपणामुळे जंगले हिरवी दिसू लागली पण चारा संपला, जैव साखळी तुटली. त्याचा फटका आता जंगला नजीकच्या शेतकऱ्यांना बसतो आहे. त्यामुळे पूर्वीच्या सर्व कुरणांचा शोध घेऊन तिथे पुन्हा चाऱ्याची लागवड करावी. 

       गावांच्या परिसरातील गायराने वनीकरण विभागाने वेगाने वाढणाऱ्या झाडांची लागवड करून ती संपवली ती पुन्हा पूर्ववत करावी. जंगल हद्दीलगतच्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सौर कुंपण घालावे. पिकाच्या नुकसानीची रक्कम शंभर टक्के मिळावी. पंचनाम्यांची किचकट प्रक्रिया सुलभ करावी. हत्ती, गवे, वाघ आदी जंगली प्राण्यांकडून शेती औजारे, वाहने, घरांचे नुकसान, हल्ल्यात मृत तसेच जखमी झालेल्या व्यक्तींना मिळणारी नुकसान भरपाई वाढवावी. ग्रामस्थ ग्रामपंचायत यांना विश्वासात घेऊन संकल्पना राबवण्यात. 

           जंगली प्राण्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी रात्री बारा बारा तास जागरण करून धोका पत्करून पिकांची रखवाली करतो, हे पाहता त्याला कुशल कामगार ठरवून दीडपट मजुरी द्यावी. आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर तालुकाप्रमुख लक्ष्मण मनवाडकर, युवा सेनाप्रमुख विक्रम मुतकेकर, महिला संघटिका शांता जाधव, उप तालुकाप्रमुख विनोद पाटील, विभाग प्रमुख संदीप पाटील आदींसह तालुक्यातील विभाग व शाखाप्रमुखांच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment