पारगड मुक्काम बस अनियमित; जंगल भागात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल - चंदगड लाईव्ह न्युज

20 November 2023

पारगड मुक्काम बस अनियमित; जंगल भागात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड आगाराच्या मनमानी कारभारामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील बस सेवा बेभरवशाची झाली आहे. अनियमित बससेवेचा फटका तालुक्यातील ग्रामीण प्रवाशांना बसत असल्याचे चित्र गेल्या दोन-तीन महिन्यापासून नित्याचे बनले आहे. तालुक्यातील विविध मार्गावरील बस फेऱ्या कोणतीही पूर्व सूचना न देता मनमानी पद्धतीने रद्द करण्यात येत आहेत. त्यामुळे चंदगड आगाराची तालुक्यात 'असून अडचण नसून खोळंबा' अशी अवस्था झाली आहे. 

      अनियमित बससेवेमुळे प्रवासी अन्य मार्गाने प्रवास करत आहेत. याचा आगाराला आर्थिक फटका बसण्याबरोबरच प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

      तालुक्यातील अनेक मार्गावरील फेऱ्या रद्द होत असताना गेली ५० वर्षे सुरू असलेली चंदगड- इसापुर, पारगड बस गेल्या काही दिवसात अचानक बंद करण्यात येत आहे. चंदगडहून ३२ किमी असलेल्या किल्ले पारगड पर्यंत हेरे पासून पुढे घनदाट जंगल परिसर सुरू होतो. या भागातील वाघोत्रे, शिंदेवाडी, गुडवळे, तेरवण, पेंढरेवाडी, इसापुर, नामखोल, मिरवेल, आदी गावात जाणाऱ्या प्रवाशी व पारगड वर जाणाऱ्या पर्यटकांना सकाळ पर्यंत एसटी स्टँड किंवा अन्य ठिकाणी झोपून काढल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. जंगल परिसरात जाणाऱ्या प्रवाशांसाठी बस नसेल तर त्यांची काय अवस्था होईल याचे तरी तारतम्य आगार व्यवस्थापनाने ठेवावे अशी अपेक्षा प्रवासी वर्गासह सर्वसामान्य नागरिकांतून होताना दिसत आहे. अनियमित बसेस मुळे चंदगड तालुक्यातील पर्यटन विकासाला खीळ बसत आहे. चंदगड ते पारगड सर्व बस फेऱ्या नियमित न ठेवल्यास आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार तसेच प्रवासी संघटनेने दिला आहे.

No comments:

Post a Comment