कर्यात भागात सुगी हंगाम जोरात, भात कापणी, बांधणी, मळणी कामांना वेग - चंदगड लाईव्ह न्युज

19 November 2023

कर्यात भागात सुगी हंगाम जोरात, भात कापणी, बांधणी, मळणी कामांना वेग

कालकुंद्री येथील शिवारात भात बांधणी कामात व्यस्त असलेले शेतकरी.
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
     चंदगड तालुक्याच्या पूर्वेकडील कर्यात भागात सुगीच्या कामांनी वेग घेतला आहे. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ऊस दरासाठी आंदोलन सुरू असल्याने ऊस तोडणी बंद आहे. परिणामी सर्वच शेतकरी कुटुंब कबील्यासह भात कापणी, बांधणी मळणीच्या हंगामात गुंतल्याचे चित्र दिसत आहे.
     यंदा पाऊसमान सरासरीपेक्षा खूपच कमी झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तथापि या भागात ताम्रपर्णी नदी तसेच शिवसेना शासन काळात कृष्णा खोरे योजनेतून झालेल्या पाच-सहा धरणांमुळे ओढ्या नाल्यांना पाणी आहे. हे पाणी मोटर पंप द्वारे शेतकऱ्यांनी भात पिकाला देऊन बऱ्यापैकी 'पिके काढली' आहेत.

    सुगीचा हंगाम खरे तर पंधरा दिवसांपूर्वीच सुरू होणे अपेक्षित होते. पण वातावरणातील बदलांमुळे मध्येच सुरू झालेल्या पाऊसाने हंगाम लांबणीवर पडला. त्यामुळे सराईवर भात कापणी शक्य झाली नव्हती. गेले दोन-तीन दिवस कोरडे हवामान असल्याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी हाताला मिळतील ते मजूर घेऊन संभाव्य अवकाळी पावसाच्या भीतीपोटी प्रामुख्याने कापणी व बांधणी सुरू केली आहे. परिणामी परिसरात मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. यात दिवाळी सुट्टीवर आलेल्या कॉलेज तरुण-तरुणी त्याचबरोबर पुणे मुंबईकडील चाकरमानी सुद्धा शिवारात राबताना दिसत आहेत. एकंदरीत ऊस तोडणी हंगाम सुरू होण्यापूर्वी भाताची सुगी आवरून घेण्याची धंदल सुरू असल्याचे चित्र कर्यात भागात दिसत आहे.


No comments:

Post a Comment