सुरुते येथील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी घेतली थेट विमानातून गरुडझेप, शैक्षणिक सहल विमानातून - चंदगड लाईव्ह न्युज

28 November 2023

सुरुते येथील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी घेतली थेट विमानातून गरुडझेप, शैक्षणिक सहल विमानातून

 

सुरुते येथील कुमार विद्या मंदिरचे विद्यार्थी विमानाने सहलीचा अनुभव घेताना

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

      सहलीचा विषय विद्यार्थ्याच्या प्रचंड आवडीचा. सहलीच्या आठवणी पुस्तकातील ‘पिंपळपान’ किंवा मोरपिसासारख्या अलगद मनामध्ये जपून राहाव्यात, असेच प्रत्येकाला वाटत असते. हेच स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी  चंदगड तालुक्यातील कुमार विद्या मंदिर सुरुते शाळेतील विद्यार्थी यंदा दिवाळीच्या सुट्टीत सहलीवर गेले आणि तेही थेट विमानातून. आतापर्यंत शाळेच्या मैदानावरून उंच आकाशात दिसणाऱ्या या विमानामध्ये प्रत्यक्ष बसून आकाश आणि पृथ्वी न्याहळण्याचा प्रत्यक्ष आनंद या विद्यार्थ्यांनी घेतला.

सर्वसामान्यपणे शाळेतील विद्यार्थ्यांची सहल खासगी  बस किंवा राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून नाहितर रेल्वेतून जाते. पण एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेणा-या  शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींची सहल थेट विमानातून काढण्याचा भिम पराक्रम सुरुते शाळेने केला.लहान मुलांना विमानाचा प्रवास अनुभवता यावा, या उद्देशाने ही सहल शाळा व्यवस्थापन समिती व पालक यानी आयोजित केली होती. सहलीत पाचवी ते सातवीपर्यंत एकूण २१ विद्यार्थ्यांना सहभाग घेतला. त्यात १८ मुली, ३ मुलांचा समावेश होता . आपल्या मुलाचे विमानात बसण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येणार, याच भावनेने पालकांनी शाळा व्यवस्थापन समिती च्या संकल्पनेला प्रतिसाद दिला. केवळ पुस्तकात किंवा उंच आकाशात दिसणाऱ्या विमानाविषयी या सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. शाळा व्यवस्थापन समितीने ही संधी उपलब्ध करून दिल्याचा आनंद मुलांनी अनुभवला. सहलीसाठी आवश्यक तयारी करण्यामध्ये विद्यार्थी आणि समिती व पालक यानी सहकार्य केले.

 याअंतर्गत विद्यार्थिनींची सहल गोवा ते  हैदराबादला  दि. २४ नोव्हेंबर रोजी विमानाने नेण्यात आली. प्रथमच विमानाची सफर करणार असल्याने उत्साह आणि जल्लोष मुलींमध्ये होता. पाठ्यपुस्तकात आणि दुरून आकाशात उडणारे विमान नेहमी पाहणारे विद्यार्थी खरे खुरे विमान पहताच आश्चर्य चकीत झाले. त्यात प्रत्यक्ष बसण्याचा अनुभव  यानिमित्ताने त्याना मिळाला. सर्व विद्यार्थी आनंदी होऊन उड्या मारायला लागली. शाळेने व ग्रामस्थांनी विमान प्रवासाची अशी संधी उपलब्ध करून दिल्या बद्दल सर्व भारावून गेले. 

     पहिला विमान प्रवास - विमानाचा प्रवास तसा प्रत्येकाला शक्य नाही. सहलीच्या निमित्ताने का होईना, विमानाची सफर करण्याचा  एक वेगळा अनुभव  विद्यार्थ्यांना मिळाला. पाठ्यपुस्तकांबरोबरच त्यांना बाहेरचे जगही कळते. या सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी हैद्राबाद मधील प्रेक्षनीय स्थळ व रामोजी फिल्म सिटी बघण्याचा आनंद घेतला.

सहलीला मुलांसोबत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भरमु आपाटेकर, उपसरपंच सौ लता  भाटे, ग्रामपंचयात सदस्या सौ प्रभावती खनगावकर, पालक  भरमु  चौगुले व नागेंद्र निंगो खनगावकर गेले होते. या सहलीसाठी ग्राम पंचयात सुरुते, शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment