चंदगड / प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी दिलेले प्रेम आणि केलेला आदर हा आयुष्यातील एक अविस्मरणीय आणि अनमोल असा खजिना आहे. आपले विद्यार्थी जीवनाच्या विविध क्षेत्रात यशस्वी झालेले पाहताना अभिमानाने उर भरून येतो.विद्यार्थ्यांनी एकमेकांशी व शाळेशी असेच घनिष्ठ ऋणानुबंध ठेवावेत.सत्कार्याने आपले व आपल्या शाळेचे नाव उज्वल करावे. सत्याच्या मार्गावरून अविरत चालत राहावे. विद्यार्यानी शिक्षकांच्या शुभेच्छा नेहमीच पाठीशी असतात हे लक्षात ठेवावे. असे प्रतिपादन माजी मुख्याध्यापक जी. जी. वाके यांनी केले. ते येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात बोलत होते. अध्यक्षस्धानी मुख्याध्यापक एन. डी. देवळे होते. प्रारंभी प्रास्ताविक राजश्री काकतकर हिने केले.
यावेळी अध्यापक सुभाष बेळगावकर यांनी २००२ सालाची एस.एस.सी. बॅच लक्षात राहील अशीच आहे असे सांगून आपल्या गतस्मृतीना उजाळा दिला. याप्रसंगी कागणकर यांनी या बॅचचे विद्यार्थी केवळ पुस्तकी कीडा नव्हते तर कला, क्रीडा या क्षेत्रातही रस असणारे विद्यार्थी होते. तसेच या विद्यार्थ्यांची चौकस वृत्ती, जिज्ञासा, संघभावना नेहमीच लक्षात राहील असे मत व्यक्त केले.
यावेळी व्ही. आर. बांदिवडेकर, मुख्याध्यापक श्री. देवळे, एम. व्ही. कानुरकर, यु. एल. पवार, श्री. नांदवडेकर, विनायक पिळणकर, सचिव आर. पी. पाटील व माडखोलकर महाविद्यालयाचे प्राचार्य पी. आर. पाटील यांनीही मार्गदर्शन केले. एस. एस. सी बॅच २००२ वर्षीच्या विद्यार्थ्यांनी मेळाव्याच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले. यापुढेही ऐक्य टिकवून विधायक सामाजिक कार्यासाठी योगदान देण्याची भावना व्यक्त केली. कीर्तीचक्र विजेते शहिद कै. शिवाजी पाटील यांची कन्या गीतांजली पाटीलचा सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्वच माजी विद्यार्थी या सोहळ्यात भारावून गेले. शाळेसाठी कृतज्ञता व्यक्त करताना एक कपाट भेट दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल भवारी हिने केले तर आभार प्रशांत वर्धन यांनी मानले.
No comments:
Post a Comment