निपाणी जवळील स्तवनिधी येथे सापडला जूना शिलालेख, दुर्लक्षित शिलालेखाचे डाॅ. सुरज मडके व डॉ. मनोज पाटील यांनी केले वाचन - चंदगड लाईव्ह न्युज

29 November 2023

निपाणी जवळील स्तवनिधी येथे सापडला जूना शिलालेख, दुर्लक्षित शिलालेखाचे डाॅ. सुरज मडके व डॉ. मनोज पाटील यांनी केले वाचन

 


नंदकुमार ढेरे / चंदगड - प्रतिनिधी

        श्रीक्षेत्र स्तवनिधी येथे एका खंडित मूर्तीवरील हळे कन्नड लिपीतील शिलालेखाचे वाचन होऊन महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. निपाणी जवळील स्तवनिधी येथे मुनि पायसागर महाराजांच्या गुंफेच्या मागील भागात एका झाडाखाली काही खंडित मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. त्यातील एका प्राचीन तीर्थंकर मूर्तीच्या पादपीठावर हा शिलालेख आढळून आला आहे.

    हे शिल्प पूर्णपणे खंडित झाली असून त्यातील तीर्थंकर मूर्ती पादपीठापासून वेगळी झाली आहे. पादपीठाला जोडून कोरीव व सुंदर नक्षीकाम केलेली प्रभावळ आहे. प्रभावळीच्या खालच्या भागात पादपीठावर डाव्या बाजूस यक्ष व उजव्या बाजूस यक्षिणी कोरले आहेत.

     डॉ. सूरज मडके व डॉ. मनोज पाटील यांना हा मूर्तीसंग्रह पार्श्वनाथ गुरुकुलाचे संचालक  महावीर पाटील यांनी दाखविला. त्यात सदर शिल्प व त्यावरील कोरीव लेख डॉ. सूरज मडके यांना आढळून आला. त्यांनी त्याचे फोटो व ठसे घेऊन कर्नाटकातील दावणगिरी येथील हळे कन्नड भाषेचे अभ्यासक व इतिहास संशोधक डॉ. रविकुमार नवलगुंद यांच्याकडून वाचन करून घेतले.

      दोन ओळींच्या या शिलालेखात द्रविड संघ व सुपार्श्वनाथ तीर्थंकर यांचा उल्लेख आहे. अवघ्या पाच शब्दांच्या या शिलालेखात महत्त्वपूर्ण इतिहास कळतो. दिगंबर जैन परंपरेत अनेक मुनिसंप्रदाय आहेत. त्यांच्या मूलसंघ, काष्ठा संघ, माथुर संघ, द्रविड संघ, यापनिय संघ इत्यादी मुख्य शाखा व नंदीगण, सेनगण, सिंहगण व देवगण इत्यादी उपप्रकार आहेत. सदर शिलालेखात द्रविल म्हणजेच द्रविड संघाची ही मूर्ती असल्याचा उल्लेख येतो. द्रविड संघाची स्थापना आचार्य पूज्यपाद देवनंदी यांचे शिष्य वज्रनंदी यांनी पाचव्या शतकात तमिळनाडूतील मदुरई येथे केली होती. काही नोंदींमध्ये हा संघ स्वतंत्र नसून मूलसंघातील एक गट असल्याचे दिसून येते. या संघातील अनेक आचार्यांनी जैन साहित्यात मोलाचे योगदान दिले आहे. दहाव्या शतकातील महान साहित्यिक न्याय, व्याकरण, काव्य ग्रंथांचे रचनाकार स्याद्वादविद्यापति आचार्य वादिराज याच द्रविड संघातील होते.

      स्तवनिधी क्षेत्राला खूप प्राचीन इतिहास आहे. सध्याच्या ज्ञात इतिहासानुसार मध्ययुगीन बादशाही काळात येथे पायाप्पा व जायाप्पा या शेट्टी बंधूंनी येथे सापडलेल्या मूर्तींसाठी मंदिर बांधले व क्षेत्राचा विकास केला. द्रविड संघाचा उल्लेख मुख्यतः दक्षिण कर्नाटक व त्या आसपासच्या भागात सापडतो. स्तवनिधीत द्रविड संघाची मूर्ती सापडणे विशेष आहे. यावरून या परिसरात देखील द्रविड संघाचे अस्तित्व होते असा अंदाज लावला जाऊ शकतो. ही मूर्ती स्तवनिधी तसेच कोल्हापूर-बेळगाव परिसराच्या सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासासाठी एक महत्त्वाचा धागा ठरू शकते.

        या शिलालेखाच्या अभ्यासासाठी स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक तसेच इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. गोमटेश्वर पाटील व  वर्धमान दिगंबरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 


शिलालेखाच्या ओळी

ओळ क्र. १ श्रीमद द्रविल संघद

ओळ क्र. २ सुपार्श्व देवरू 

अर्थ : श्रीमद द्रविड संघाचे सुपार्श्वनाथ देव 

No comments:

Post a Comment