चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील अत्यंत महत्त्वाचा असलेल्या कोवाड, दुंडगे, चिंचणे, कामेवाडी या १० किलोमीटर रस्त्याची प्रचंड दूरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून दुचाकी व चार चाकी असे कोणत्याही प्रकारचे वाहन चालवणे अवघड झाले आहे.
या रस्त्याचे रुंदीकरणासह मजबूत खडीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षामार्फत जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे करण्यात आली होती. तसेच या प्रश्नी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. तथापि हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला असून त्या कार्यालयाकडे संपर्क साधावा असे लेखी पत्र उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग चंदगड यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख लक्ष्मण मनवाडकर यांना देवून या प्रश्नी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना कार्यालयाकडे संपर्क साधण्याबद्दल सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार तालुका प्रमुख लक्ष्मण मनवाडकर व अवजड वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील आदींनी संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तात्काळ रस्ता काम हाती घ्यावे अशी मागणी केली आहे.
खड्ड्यांमुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून यावरुन प्रवास करणारे प्रवासी व वाहनधारक मेटाकुटीला आले आहेत. त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून हा रस्ता केव्हा पूर्ण होईल याची उत्सुकता लागली आहे.
No comments:
Post a Comment