सरस्वती विद्यालय कालकुंद्री येथील 'अक्षर दिवाळी' उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

14 November 2023

सरस्वती विद्यालय कालकुंद्री येथील 'अक्षर दिवाळी' उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

 

हस्ताक्षर कार्यशाळेला उपस्थित मार्गदर्शक व विद्यार्थी

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

      विद्यार्थ्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे त्याचे हस्ताक्षर...! जे कधीही क्षर होत नाही, नष्ट होत नाही, ते अक्षर. आजच्या संगणकाच्या युगातही सुंदर अक्षराचे महत्व तितकेच  टिकून राहिले आहे. सुंदर अक्षर म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख असते. असे मत जयप्रकाश विद्यालय किणीचे मुख्याध्यापक पांडुरंग मोहनगेकर यांनी व्यक्त केले. कालकुंद्री येथील सरस्वती विद्यालयात आयोजित केलेल्या 'अक्षर दिवाळी, हस्ताक्षर वर्ग' कार्यशाळेत ते बोलत होते. मोफत कार्यशाळा भरविल्याबद्दल मोहनगेकर यांनी मार्गदर्शकांचा सत्कार केला. यावेळी माणगाववाडीच्या शिक्षिका सौ कोमल शेटजी उपस्थित होत्या.

       या कार्यशाळेत विद्यार्थ्याना हस्ताक्षर मार्गदर्शक सुभाष बेळगांवकर यांनी विद्यार्थ्याना लेखनाची बैठक, लेखनी धरण्याची पध्दत, अक्षरांचे अवयव कसे काढावेत याचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या लेखणीला सुंदर हस्ताक्षराची गोडी लावण्यासाठी विद्यालयात इयत्ता १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यासाठी मोफत हस्ताक्षर कार्यशाळेचे आयोजन चंदगड तालूका माध्यमिक शिक्षक संघातर्फे करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी कोवाड, राजगोळी, तळगुळी, कुदनुर, किणी, ढोलगरवाडी, कारवे येथून ११० विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यशाळेसाठी एस. व्ही. जाधव, ई. एल. पाटील, एन. जे. बाचूळकर व बी. ए. तुपारे, निवृत्ती लोहार मामा, दिनकर कांबळे आदींचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment