स्वतः अशिक्षित; तरीही १६ नातवंडांना 'ग्रॅज्युएट' बनवणाऱ्या १०५ वर्षांच्या कालकुंद्रीतील आजी 'कै रुक्मिणी जोतिबा पाटील' - चंदगड लाईव्ह न्युज

19 November 2023

स्वतः अशिक्षित; तरीही १६ नातवंडांना 'ग्रॅज्युएट' बनवणाऱ्या १०५ वर्षांच्या कालकुंद्रीतील आजी 'कै रुक्मिणी जोतिबा पाटील'

कै. श्रीमती रुक्मिणी जोतिबा पाटील

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
     स्वतः अशिक्षित असूनही आपल्या मुला- मुलींना सुशिक्षित करण्याबरोबरच तब्बल १६ नातवंडांना ग्रॅज्युएट व डबल ग्रॅज्युएट करणाऱ्या, चार पिढ्या पाहिलेल्या आजीबाई तथा  कालकुंद्री येथील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष एम जे पाटील यांच्या मातोश्री कै श्रीमती रुक्मिणी जोतिबा पाटील यांचे सोमवार दि. ६ नोव्हेंबर २०२३ रोजी वयाच्या १०५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानिमित्त त्यांच्या विषयी थोडेसे....
मातोश्री रुक्मिणी यांच्यासोबत एका पर्यटन स्थळावरील निवांत क्षणी सामाजिक कार्यकर्ते एम जे पाटील व त्यांच्या सौभाग्यवती माजी जिप. सदस्या सुजाता पाटील

      वयाच्या १८ व्या वर्षी म्हणजे सन १९३५ मध्ये रुक्मिणी कालकुंद्री येथील सत्यशोधक समाजाचा वारसा चालवणाऱ्या मुरारी पाटील यांच्या सुनबाई व शेतकरी असलेल्या जोतिबा यांच्या सौभाग्यवती म्हणून कालकुंद्रीत प्रवेश करत्या झाल्या. त्याकाळी दादर- मुंबई सारख्या ठिकाणी बिल्डर  असलेले त्यांचे वडील व उचगाव, ता. जि. बेळगाव येथील मुळचे रहिवासी खंडोजीराव पावशे हे लग्नप्रसंगी त्यांना चार चाकी वाहनातून घेऊन आले होते. चार चाकी वाहनातून नवरा नवरीची वरात निघायची कर्यात भागातील ही पहिलीच घटना असल्याने पंचक्रोशीतील नागरिक ही वरात पाहण्यासाठी मोठ्या संख्येने हजर होते.  
     रुक्मिणी यांचे  लग्नापूर्वीचे नाव होते 'नागुबाई'. जन्मापूर्वी  त्यांची आई उमाबाई उर्फ सावित्री यांच्या उदरात असताना घराच्या गोठ्यात भला मोठा नाग साप सलग दोनतीन दिवस आपला फणा काढून उभा होता. शेवटी आई सावित्री हिने "माझ्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळाचे नाव तुझ्या नावाने ठेवीन..!" असे म्हणत त्याला नमस्कार केल्यानंतर तो अंतर्धान पावला. काही दिवसानंतर जन्माला आलेल्या मुलीचे नाव म्हणूनच 'नागू' असे ठेवण्यात आले होते. कु नागु यांचे बालपण मुंबईत गेले, पण ब्रिटिश काळात मुंबईत झालेल्या वांशिक दंगली नंतर वारंवार होणाऱ्या अशा घटनांना कंटाळून हे कुटुंब  उचगावला येऊन कायमचे स्थायिक झाले.
      सुखवस्तू घरात वाढलेल्या रुक्मिणी यांनी लग्नानंतर गावालगतच्या ताम्रपर्णी नदीतून अर्धा किलोमीटर चिखलातून पाणी आणणे, गुराढोरांचे शेण काढणे, घरकाम आवरून शेताकडे जाणे या सर्व गोष्टींशी जुळवून घेतले. त्यांचे दोन दीर बेळगाव येथे स्थायिक असल्याने  ब्रिटिश पोलीसांच्या भीतीने बैलगाडीतून गवतात लपवून तांदूळ व इतर साहित्य घेऊन जावे लागायचे. ब्रिटिश काळात चले जाव सारख्या स्वातंत्र्य लढ्यातील चळवळी नेहमी सुरू असायच्या पोलीस शोधायला यायचे.  अशावेळी चळवळीत सहभागी सासरे, पती व दिर भूमिगत व्हायचे. अशा अनेक आठवणी त्या सांगायच्या. 
     काही वर्षांतच कालकुंद्री येथे तालुक्यातील सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांकडून तालुक्यातील पहिली माध्यमिक शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यांचे दीर तिथे शिक्षक म्हणून असल्याने बऱ्याच बैठका मुरारी पाटील यांच्या घरी व्हायच्या. दूरवरून आलेल्या या कार्यकर्त्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था त्या मनापासून करायच्या. १९५३ साली चंदगड तालुक्यात कालकुंद्री येथे 'खेडूत शिक्षण मंडळ कालकुंद्री' संचलित श्री सरस्वती विद्यालय च्या माध्यमातून माध्यमिक शिक्षणाची कवाडे खुली झाली, त्यात रुक्मिणी पाटील यांचे असलेले अप्रत्यक्ष योगदान नाकारता येणार नाही. याच शाळेत त्यांनी आपल्या चार मुली इंदू, विमल, मंगल, रेणुका व तीन मुलगे कै बाळासाहेब,  अमृत व मारुती यांना शिक्षण देऊन सुशिक्षित केले. तर नंतरच्या पिढीतील १६ नातवंडांना ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट केले. त्यांची नात तेजस्विनी आज तहसीलदार म्हणून कार्यरत आहे. अशाप्रकारे त्यांनी आपण अशिक्षित असलो तरी मुले व नातवंडांना सुशिक्षित करण्याचे ध्येय पूर्ण केले.
      मुलगा मारुती  (एम. जे. पाटील) हे चंदगड तालुक्यात समाजकारण व राजकारणात सक्रिय आहेत. सुनबाई सौ सुजाता मारुती पाटील या जिल्हा परिषद सदस्य होत्या. त्यांना राजकारण व समाजकारणात यशस्वी करण्यात रुक्मिणी मातोश्री यांचा मोलाचा वाटा आहे. चंदगड तालुक्यात एकही दूध संस्था नव्हती त्या काळात हे कुटुंब घरोघरी जाऊन दूध भरण्याचे काम करत असे. तथापि यातून दूध उत्पादकांच्या पदरी काही पडत नाही हे ओळखून त्यांनी मुलगा एम जे पाटील यांना कालकुंद्री येथे तालुक्यातील पहिली सहकारी दूध संस्था सुरू करण्यास प्रोत्साहित केले. यातूनच 'काशिलिंग सहकारी दूध संस्था कालकुंद्री' या चंदगड तालुक्यातील पहिल्या सहकारी दूध संस्थेचा सन १९७९ मध्ये उदय झाला.
   रुक्मिणी पाटील गावातील किंबहुना तालुक्यातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून गणना होती. त्यांना अखेर पर्यंत कोणतीही शुगर, बीपी सारखी गोळी नव्हती. चष्मा नसतानाही मृत्यूपूर्वीच्या पंधरा दिवसापर्यंत त्यांनी धान्यही निवडायचे काम केले. त्यांची स्मरणशक्ती प्रचंड होती,  अनेक महिने किंवा वर्षांनंतर घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ओळखून ही माऊली आस्थेवाईकपणे  चौकशी करून नको नको म्हणत असताना त्यांना जेऊखाऊ घालायची. यामुळे त्यांनी समाजात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. याची साक्ष त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी हजारोंची शोकाकुल गर्दीच देत होती. मुले, नातू ,पणतू, खापर पणतू अशा चार पिढ्या पाहिलेल्या पण सर्वांना हव्या हव्याशा वाटणाऱ्या मातोश्री रुक्मिणी जोतिबा पाटील यांना कालकुंद्री ग्रामस्थ, चंदगड तालुक्यातील विविध पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते कधीच विसरणार नाहीत.  चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एल न्यूज कडून त्यांच्या पवित्र आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली...!

      शब्दांकन - श्रीकांत वैजनाथ पाटील, कालकुंद्री (उपाध्यक्ष- चंदगड तालुका पत्रकार संघ)

No comments:

Post a Comment