हत्तींनी लोळून जमीनदोस्त केलेल भातपिक.
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
कानूर खुर्द (ता. चंदगड) पैकी धनगरवाडा येथे हत्तीच्या कळपाने शेतीचे लाखोचे नुकसान केले आहे. हातातोंडाशी आलेली शेतीपिके शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत हत्तीच्या कळपाने जमीनदोस्त केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सायंकाळी आलेल्या हत्तींनी रात्री शेतामध्येच मुक्काम केल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत वनविभागाला कळवूनही त्यांच्याकडून वेळेत मदत मिळाली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणने आहे.
यामध्ये भात व नाचना या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जंगली हत्तीकडून पिके खाण्यापेक्षा त्यांच्या पायामुळे, पिकांतून गेल्यामुळे व पिकात बसल्याने अधिक नुकसान झाले आहे.
धोंडीबा विठू येडगे, कोंडीबा धोंडीबा येडगे, चिचू बमू येडगे, विठू बिरू येडगे, धाकोजी तानाजी शेळके, बाबुराव धोंडीबा झोरे, बापू धोंडीबा झोरे, जानू धोंडीबा झोरे, धोंडीबा तानाजी शेळके व कोंडीबा धोंडीबा झोरे या धनगरवाड्यावरील शेतकऱ्यांंचे अंदाजे लाखोंचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त झाल्याने आता वर्षभर खायचे काय असा सवाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे. वनविभागाकडून मिळणारी नुकसान भरपाई तुटपुंजी असल्याने शेतकरी चिंतेत आहे. वनविभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई मिळवून देण्याची कार्यवाही करावी अशी मागणी आहे. तसेच जंगली हत्तीचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.घटनेबाबत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कळवूनही त्यांच्याकडून वेळेत मदत मिळत नसल्याने ग्रामस्थ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्यावर नाराज आहेत.
No comments:
Post a Comment