चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र, मुंबई यांच्या सूचनेनुसार आज शुक्रवार दि. ८ डिसेंबर २०२३ रोजी चंदगड तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर सकाळी ११ ते ५ या वेळेत १८ ते १९ वर्षे वयोगटातील नवमतदार नोंदणीचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती राजेश चव्हाण तहसीलदार चंदगड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
भारत निवडणूक आयोगाने 'विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-२०२४' घोषित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत १८ ते १९ वयोगटातील नव मतदार नोंदणी ची कार्यवाही सुरू आहे. २०२४ हे वर्ष निवडणूक वर्ष असल्यामुळे येत्या सर्वत्रिक निवडणुकांपूर्वी होणारे हे शिबिर म्हणजे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी शेवटची संधी असणार आहे.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी ३१ डिसेंबर २००५ पूर्वी जन्म झालेल्या मुलांच्या मतदारसंघातील ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका येथील जन्म नोंदी, शाळांमधील सन २०२०-२१ मध्ये इयत्ता दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची यादी संबंधितांनी बी एल ओ तथा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना प्राप्त करून द्यावी अशा सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. नोंदणीचा अहवाल त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता घेतला जाणार आहे.या दिवशी शिबिरांच्या ठिकाणी तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच वरिष्ठ कार्यालयाचे अधिकारी भेटी देऊन कामकाजाचा आढावा घेणार आहेत. ज्या मुला- मुलींचा जन्म ३१ डिसेंबर २००५ पूर्वी झाला आहे, त्यांनी जन्मतारीख पुरावा, रहिवासी पुराव्यासह आपल्या संबंधित मतदान केंद्रावर जाऊन आपले नाव मतदार यादी त नोंद करून घ्यावे. असे आवाहन उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार राजेश चव्हाण, नायब तहसीलदार हेमंत कामत यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment