विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, अभ्यासू वृत्ती सोबत वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला पाहिजे...!- तहसीलदार राजेश चव्हाण, कुदनूर येथील ५१ व्या विज्ञान प्रदर्शनात १०० उपकरणांचा सहभाग - चंदगड लाईव्ह न्युज

07 December 2023

विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, अभ्यासू वृत्ती सोबत वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला पाहिजे...!- तहसीलदार राजेश चव्हाण, कुदनूर येथील ५१ व्या विज्ञान प्रदर्शनात १०० उपकरणांचा सहभाग

प्रदर्शनातील उपकरणे पाहताना तहसीलदार राजेश चव्हाण व मान्यवर

कुदनूर : सी. एल. वृत्तसेवा

      "जिद्द, चिकाटी आणि अभ्यासू वृत्ती यांच्यासोबत विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासल्यास निश्चित यश मिळते. समाजातील अंध रुढी, परंपरांच्या आहारी न जाता सत्यशोधक व वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांनी जीवनात अंगीकारला पाहिजे." असे प्रतिपादन चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी केले. ते कुदनूर येथील श्री सिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये सुरू असलेल्या ५१ व्या चंदगड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी विविध स्पर्धांत यश मिळविलेल्या तालुक्यातील विद्यार्थी, शिक्षकांना त्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी विचारपीठावर प्राचार्य टी एल तेरणीकर, शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष बिरंजे, केंद्रप्रमुख बाळू प्रधान, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील आदींची उपस्थिती होती.

        प्रदर्शनाचे उद्घाटन दि. ५ रोजी कुदनूरच्या सरपंच संगीता घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते  झाले. यावेळी  गटविकास अधिकारी सुभाष सावंत, गटशिक्षणाधिकारी सौ सुमन सुभेदार, उपसरपंच अशोक वडर आदींची उपस्थिती होती. दि. ५ ते ७ डिसेंबर २०२३ पर्यंत चाललेल्या प्रदर्शनाचा मुख्य विषय 'समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान' हा असून यातील आरोग्य, जीवनशैली, शेती, वाहतूक आणि दळणवळण, संगणकीय विचार या उपविषयांवर आधारित इयत्ता ६ ते ८ प्राथमिक विद्यार्थी गटातून ३७, इयत्ता ९ ते १२ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थी गटातून ४६, प्राथमिक शिक्षक शैक्षणिक साधने ७, माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साधने ७ व प्रयोगशाळा परिचर २ अशी एकूण १०० उपकरणे मांडण्यात आली होती. प्रदर्शन पाहण्यासाठी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून माध्यमिक, उच्च माध्यमिक, प्राथमिक शाळांचे विद्यार्थी व पालकांनी प्रचंड गर्दी केली होती.

    प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी अनंत भोगण, दस्तगीर उस्ताद रामा व्हन्याळकर, यादू मोदगेकर, विनायक गावडा, सुखदेव भातकांडे, बाळकृष्ण मुतकेकर आदी प्राथमिक माध्यमिक शिक्षकांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment