शेती उत्पादनासाठी किडीचे नियंत्रण महत्वाचे : प्रा. डॉ. अभयकुमार बाडगे, हलकर्णी महाविद्यालयात 'कृषी व्यवस्थापन आणि शासकीय योजना 'यावर अग्रणी कार्यशाळा - चंदगड लाईव्ह न्युज

30 December 2023

शेती उत्पादनासाठी किडीचे नियंत्रण महत्वाचे : प्रा. डॉ. अभयकुमार बाडगे, हलकर्णी महाविद्यालयात 'कृषी व्यवस्थापन आणि शासकीय योजना 'यावर अग्रणी कार्यशाळा



चंदगड / प्रतिनिधी

       'पिकांचे उत्पादन घेताना कीड व रोग यांना सामोरे जावे लागते . सतत कीटकनाशक व आदी गोष्टी वापरु नका.  कीड व रोग यांची ओळख करून घेणे गरजेचे आहे. निसर्ग नेहमी समतोल राखत असतो कारण ९८% टक्के किडीचे नियंत्रण निसर्ग करतो असे आढळून येते. नैसर्गिक घटकांची भूमिका महत्त्वाची असल्याने त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. एकात्मिक पद्धत शेतीत महत्त्वाची आहे. पाचट कुजवून वापरा तर ते जाळू नका कारण त्याचा फायदा शेतीला होतो. विविध किडीवर योग्य ते उपचार करा. नियोजनबद्ध शेती करा. संकरित वाण कमीत कमी वापरा. असे केल्यास चांगल्या पद्धतीचे उत्पादन मिळू शकते. शेती उत्पादनासाठी किडीचे नियंत्रण होणे गरजेचे आहे.' असे प्रतिपादन कोल्हापूर येथील प्रा.डॉ. अभयकुमार बाडगे यांनी केले.ते हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविधालय व गुरुवर्य गुरुनाथ विठठल पाटिल कनिष्ठ महाविद्यालयात शिवाजी विधापीठ कोल्हापूर अंतर्गत अग्रणी महाविद्यालयात आयोजित कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कृषी व्यवस्थापन आणि शासकीय योजना या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील होते.

         महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत अग्रणी कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेनिमित्त कृषी मेळावा व कृषी प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी  चंदगड कृषी अधिकारी अनिकेत माने , दौलत विश्वस्थ संस्थेचे अध्यक्ष अशोक जाधव ,उपाध्यक्ष संजय पाटील , सचिव विशाल पाटील ,अग्रणी महाविद्यालय योजनेच्या कार्यकारी समितीचे सदस्य आणि नेसरी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस बी भांबर ,मल्लिकार्जुन मुगेरी, प्राचार्य डॉ बी डी अजळकर, डॉ. सी बी पोतदार आदी मान्यवर उपस्थित होते. 

       प्रारंभी रोपट्याला पाणी घालून मान्यवरांच्या शुभ हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. समन्वयक डॉ सी बी पोतदार यांनी प्रास्ताविक केले. सर्व उपस्थितांचे स्वागत समन्वयक प्रा जी जे गावडे यांनी केले. 

      याप्रसंगी खरीप हंगाम २०२२ पीक स्पर्धेत विविध स्तरावर विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला . यामध्ये शिवलिंग गावडे , बाळू भडगावकर , विष्णू गावडे ,अनिता दळवी ,दिनकर नेवगे मारुती पाटील, अरुण पाटील विठोबा देसाई संभाजी पेडणेकर दयानंद गावडे सुरेश गावडे पांडुरंग मटकर गोपाळ पाटील शिवाजी पाटील , पांडुरंग पाटील आदींचा समावेश होता. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. 

         तर दुसऱ्या सत्रात बोलताना चंदगड कृषी अधिकारी अनिकेत माने म्हणाले, 'अनेक कृषी विषयक शासकीय योजना आहेत त्यांचा लाभ घ्या. गांडूळ खतांचा वापर करा. पिके चांगली येतील पाचट व्यवस्थापन यावर सर्वांनी एकत्रित काम करूया. पाचट कुट्टी यंत्र वापरून पाला कुट्टी करून घ्यावा. कृषी विभागाकडून अनुदानावर अनेक साहित्य मिळते त्याचा फायदा घ्या. अशा मेळाव्यातून शेतकऱ्यांना प्रबोधन मिळते त्यामुळे अशा मेळाव्यांना उपस्थित रहा अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा.' 

         तर अध्यक्षीय मनोगतात बोलताना गोपाळराव पाटील म्हणाले, 'जमिनीची पोत सुधारल्यास पिकांचे उत्पादन वाढेल. महाविद्यालयात जसा विद्यार्थी घडतो तसा शेतकरी माहिती पूर्ण व्हावा त्यांच्यापर्यंत नवनवीन माहिती ,योजना पोहोचावी हा या शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शनाचा उद्देश आहे. शेतकरी वर्षभर काबाड कष्ट करतो परंतु पदरी निराशाच पडते हे नियोजनातील अभावामुळे घडते. जमिनीची कस कशी वाढेल याकडे लक्ष देणे गरजेचे नियोजनबद्ध शेती करणे काळाची गरज होय. जमिनीची कस व प्रत चांगली ठेवण्यासाठी माती परीक्षण करून घ्या .शेतीच्या  विविध तपासणी करून घ्या . इतरांचे अनुकरण करा रताळी ऊस यासारख्या पिकांना आधुनिक काळात महत्व आहे ते उत्तम रीतीने घ्या.' 

        यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष तसेच कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते यामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होता. महाविद्यालय आवारात कृषी मेळाव्यानिमित्त अनेकांनी विविध प्रकारचे स्टॉल लावले होते. यामध्ये शेती अवजारे खते बी बियाणे सेंद्रिय खते ट्रॅक्टर रोटर सेंद्रिय उत्पादने आदी स्टॉल लावण्यात आले होते. रामदास पाटील संजीवनी फूड प्रॉडक्ट्स ढोलगरवाडी संतोष बाळू सदावर हरे लक्ष्मी ऍग्रो प्रॉडक्ट पाटणे फाटा इंडस्ट्रीज नेटाफिमसॉईल वॉल्ट ऍग्रो टेक फार्महब आदींनी स्टॉल लावले होते. या विविध उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांनी घेतले व समाधान व्यक्त केले. या कार्यशाळेसाठी अग्रणी महाविद्यालया अंतर्गत चंदगड आजरा गडिंग्लज या तालुक्यातील अनेक महाविद्यालयांचे प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित राहिला होता. महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी आदींनी या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. पी ए बोभाटे यांनी केले तर आभार डॉ ए व्ही पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment