चंदगड तालुक्यातील पार्ले येथे पकडला १२ फुटी महाकाय किंग कोब्रा...! आद्य सर्पमित्र कै बाबुराव टक्केकर यांचे पुत्र संदीप टक्केकर यांचे धाडस - चंदगड लाईव्ह न्युज

12 December 2023

चंदगड तालुक्यातील पार्ले येथे पकडला १२ फुटी महाकाय किंग कोब्रा...! आद्य सर्पमित्र कै बाबुराव टक्केकर यांचे पुत्र संदीप टक्केकर यांचे धाडस

आद्य सर्पमित्र कै बाबुराव टक्केकर यांचे चिरंजीव संदीप टक्केकर यांनी पार्ले येथे पकडलेला महाकाय नागराज अर्थात किंग कोब्रा

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

     चंदगड तालुक्यातील मोटनवाडी- तिलारीनगर मार्गावरील पार्ले येथे आढळलेल्या महाकाय अशा १२ फूट लांबीचा किंग कोब्रा पकडण्याचे धाडस ढोलगरवाडी येथील तरुण सर्पमित्र संदीप टक्केकर यांनी दाखवले. 

       देशातील सर्वात जहाल विषारी आणि आकाराने मोठा समजला जाणारा किंग कोब्रा चंदगड तालुक्यात पहिल्यांदाच पार्ले या गावात आढळला. ११ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास भिकाजी दळवी हे गवत कापत असताना त्यांना हा साप दिसला. पार्ले येथून सर्पमित्र संदीप टक्केकर यांना फोन आला. त्याच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे सकाळी साडेदहा वाजता मजरे कार्वे  तर दुपारी १२ माणगाववाडी (ता. चंदगड) येथे राहत्या घरात शिरलेले दोन साप संदीप यांनी पकडले होते. तेथून येऊन ड्युटी संपत असताना थकलेल्या संदीप यांना हा  फोन आला. कंटाळल्या अवस्थेतही नेहमी प्रमाणे संदीप तातडीने आपली दुचाकी घेऊन बाहेर पडले. त्यांच्यासोबत दुसरे सर्पमित्र अर्जुन टक्केकर हे सुद्धा होते.  पार्ले येथे साप  गेलेल्या झुडपाच्या आजूबाजूला बघ्यांची प्रचंड गर्दी होती. एखादा धामण साप असेल आणि तो पाहण्यासाठी एवढी गर्दी कशाला? असा प्रश्न संदीप यांना पडला. पण जवळ जाऊन पाहिल्यावर प्रचंड आकाराचा किंग कोब्रा पाहताच दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला. संदीप यांनी अर्जुनच्या साथीने रेस्क्यूला सुरुवात केली.


         सुमारे ४३ वर्षांपूर्वी म्हणजे १९८० मध्ये संदीप यांचे वडील आद्य सर्पमित्र कै बाबुराव सट्टूपा टक्केकर यांनी अशाच प्रकारे खानापूरच्या जंगलात १३ फूट लांबीचा मादी जातीचा किंग कोब्रा पकडून ढोलगरवाडीच्या सर्पालयात आणला होता. तेव्हाच्या नागपंचमीला ढोलगरवाडी येथे हा साप पाहण्यासाठी हजारो लोकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत होते त्यांचे भाऊ तानाजी सट्टूप्पा वाघमारे (टक्केकर). 

      तशीच  किंग कोब्रा पकडण्याची संधी संदीप यांना मिळाली तेही चंदगड तालुक्यात. आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले संदीप ही संधी सोडणे शक्य नव्हते. त्यांनी पार्ले गावातील झुडपात लपलेला किंग कोब्रा पकडण्याचे यशस्वी धाडस दाखवले. या सापाला पिशवीत घालण्यासाठी तीन पिशव्या झुडपाच्या बाजूला लावल्या पण त्यात जाण्याऐवजी तो भीतीदायक फणा काढून संदीप यांच्यावर वारंवार हल्ल्याचा प्रयत्न करत होता. शेवटी संदीप यांनी शिताफिने सापाच्या शेपटीचा ताबा मिळवला. मोठ्या पीव्हीसी  पाईपच्या सहाय्याने सापाला पिशवीत घालण्यात यश मिळवले. सापाला पूर्ण ताब्यात घेईपर्यंत अंधार झाला होता. तत्पूर्वी पाटणे वनक्षेत्राचे रेंजर पी ए आवळे वनपाल नेताजी धामणकर व सर्व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते. शेवटी त्यांच्या सहकार्याने किंग कोब्रा ला रात्री नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. 

     प्रथम वडील व  त्यांच्या मुलानेही किंग कोब्रा पकडल्याची जगातील दुर्मिळ घटना असावी. 

     या घटनेने ढोलगरवाडी येथील सर्प शाळेचे महत्त्व किती मोठे आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 'झू अथॉरिटी ऑफ इंडिया, नवी दिल्ली' यांनी या सर्प शाळेची मान्यता रद्द करण्याचे दिलेले आदेश किती चुकीचे आहेत, हे या घटनेवरून स्पष्ट होते. कै बाबुराव टक्केकर यांनी ढोलगरवाडीत १९६६ मध्ये सुरू केलेल्या सर्प शाळेतून हजारो सर्पमित्र तालुका व देशाच्या कानाकोपऱ्यात पसरले आहेत. ते पर्यावरण साखळीतील सर्वोच्च स्थानी असलेल्या सापांना जीवदान देऊन शासनाचेच काम विनामूल्य करत आहेत. हे ओळखून केंद्र शासन व वन्य प्राणी संग्रहालय मंत्रालय यांनी आता तरी ढोलगरवाडी येथील सर्पालय साठी गेल्या अनेक वर्षांच्या प्रलंबित असलेल्या मागणीनुसार पुरेशी जमीन व आर्थिक अनुदान देण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment