गारगोटी- तिलारी राज्यमार्गापैकी चंदगड शहरातील रस्ता घाईने पूर्ण करण्याचा डाव हाणून पाडू ...! शहरवासीयांचे तहसीलदारांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

30 January 2024

गारगोटी- तिलारी राज्यमार्गापैकी चंदगड शहरातील रस्ता घाईने पूर्ण करण्याचा डाव हाणून पाडू ...! शहरवासीयांचे तहसीलदारांना निवेदन

 

चंदगड शहरातून जाणाऱ्या राज्य मार्गाचे नियमबाह्य डांबरीकरण थांबवावे यासाठी तहसीलदार यांना निवेदन देताना चंदगड येथील ग्रामस्थ

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

         गारगोटी- तिलारी राज्य मार्ग पैकी चंदगड शहरातील छत्रपती संभाजी चौक ते ब्राह्मण गल्ली पर्यंत सुमारे १ किलोमीटर रस्त्याचे काम नियमबाह्य व  घिसाडघाईने करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले रस्त्याचे काम आपण होऊ देणार नाही. प्रसंगी आंदोलन छेडले जाईल असा इशारा सुरेश सातवणेकर अध्यक्ष भाजपा चंदगड शहर, संगम नेसरीकर व ॲड. विजय कडूकर  यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी तहसीलदार चंदगड यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

        राज्य शासनामार्फत गारगोटी ते तिलारी हा राज्य मार्ग नव्याने करण्याचे काम सुरू आहे. सदरचा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या देखरेखीखाली सुरू असून रस्त्याचे बरेचसे काम पूर्ण झाले आहे. शिल्लक कामापैकी चंदगड शहरातील छत्रपती संभाजी चौक ते ब्राह्मण गल्ली हा भाग नियमांनुसार दोन्ही बाजूंचे आरसीसी गटर बांधणे व रस्त्याची रुंदी नऊ मीटर अद्यावत काँक्रिटीकरण पद्धतीने करण्याचे आहे. तथापि ठेकेदाराकडून नियमबाह्य पद्धतीने काम सुरू असून घाई गडबडीत आहे त्या रस्त्यावरच डांबरीकरण करून कामकाज आटोपण्याचा खटाटोप सुरू आहे. हा रस्ता तिलारीच्या पुढे गोव्याला जोडणारा असल्याने पुढील २५ वर्षांचा विचार करून मजबूत बनवणे गरजेचे आहे. टेंडर मध्येही तसे नमूद असतानाही बांधकाम विभागाच्या डोळेझाक वृत्तीचा फायदा उठवत ठेकेदाराकडून आहे त्या रस्त्यावर खडीकरण डांबरीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत विचारायला गेले असता ठेकेदाराने नेमलेले कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहेत. हे चुकीचे असून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मूळ ठेकेदाराला बोलवून टेंडर नुसार काम करण्यास भाग पाडावे. अन्यथा या प्रश्नी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. यामुळे कायदा व्यवस्थेचा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी आपल्यावर राहील. अशा आशयाचे निवेदन तहसीलदार चंदगड यांच्यासह पोलीस निरीक्षक चंदगड व उपाभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांना देण्यात आले आहे. निवेदनावर सुरेश सातवणेकर, शरद पवार, डॉ परशराम, अशोक शिवणगेकर, संदीप कोलेकर, प्रवीण नेसरीकर आदींच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment