सिंहगडावरील तानाजी मालुसरे यांच्या स्मारक स्थळी रायबा मालुसरे यांच्या फोटोचे प्रकाशन करताना समस्त मालुसरे कुटुंबीय
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
४ फेब्रुवारी १६७० रोजी सिंहगड लढाईत तानाजी मालुसरे शहीद झाले. यानंतरच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेच्या मोहिमेवर असताना या पारगड किल्ल्याची निर्मिती केली. सुमारे पाचशे मावळे दिमतीला देत तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा यांना किल्लेदारी बहाल करत "आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत गड राखा..!" असा आदेश देऊन गड सोडला. हा आदेश शिरसावंद्य मानून हा किल्ला अभेद्य ठेवण्याची कामगिरी पारगडचे पहिले किल्लेदार रायाजी उर्फ रायबा मालुसरे यांनी पार पाडली. महाराजांच्या आदेशाचे पालन साडेतीनशे वर्षानंतर आजही पारगड वरील रहिवाशी करत आहेत.
सन १६७४ नंतर तब्बल साठ वर्षे पारगड वर वास्तव्य करून सिंधुदुर्ग व छत्रपतींनी स्थापन केलेल्या अरबी समुद्रातील आरमाराला रसद पुरवण्याचे काम रायाजी यांनी केले. सोबतच गोव्यातील पोर्तुगीज, इंग्रज व कर्नाटक प्रांतावर वचक ठेवला. त्यांच्या स्मृती चिरंतन जतन करण्यासाठी रायाजी यांचे यथोचित स्मारक व पुतळा पारगड वर उभारण्याचा निर्णय दुर्गप्रेमी, शिवप्रेमी व मालुसरे कुटुंबीयांनी घेतला आहे. २५ नोव्हेंबर २०२३ रोजी स्मारकाचे भूमिपूजन करून उभारणीला सुरुवात झाली असली तरी निधी अभावी काम संथ गतीने सुरू आहे. याला गती देण्यासाठी शासन स्तरावरून मदतीची गरज असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ व चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी पुढाकार घेऊन निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच दानशूर संस्था व व्यक्तींनी या कामी आर्थिक सहकार्य करावे अशी मागणी शिवप्रेमी व मालुसरे कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.
दरम्यान देशात विखुरलेल्या मालुसरे कुटुंबीयांनी सिंहगडावरील नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या स्मारक स्थळी एकत्र येत सुभेदार रायबा यांच्या फोटोचे प्रकाशन केले. या फोटोवरूनच पारगड येथे त्यांच्या पुतळ्याची उभारणी होणार आहे. यावेळी तानाजी व सूर्याजी या बंधूंचे पारगड, चंदगड, उमरठ, पोलादपूर, मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगाव आदी ठिकाणी वास्तव्य करून असलेले वंशज मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment