काजू मोहर संरक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड रोग नियंत्रण पद्धतीचा अवलंब करा - कृषी महाविद्यालय कोल्हापूरचे प्रा. डॉ. अभयकुमार बागडे - चंदगड लाईव्ह न्युज

04 January 2024

काजू मोहर संरक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड रोग नियंत्रण पद्धतीचा अवलंब करा - कृषी महाविद्यालय कोल्हापूरचे प्रा. डॉ. अभयकुमार बागडे


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      चंदगड तालुक्यातील  बागिलगे येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग व ग्रामपंचायत बागिलगे यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक काजू लागवड तंत्रज्ञान व काजू मोहर व्यवस्थापन बाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

      चंदगड तालुक्यातील  शेतकरी काजू  मोहर व्यवस्थापन कडे लक्ष देत नाहीत, योग्य वेळी आवश्यक फवारणी करत नाहीत, झाडांना खते देत नाहीत, त्यामूळे उत्पादन निम्म्याने घटते, तेव्हा या शेतकऱ्यांना मोहर व्यवस्थापन कसे करावे, फवारणी कोणत्या व कशा कराव्यात, याबाबत सखोल माहिती व्हावी व चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांचे काजू उत्पादन दुप्पट व्हावे या हेतूने ही कार्यशाळा आयोजित केली असल्याचे प्रास्ताविकात राज्यकर अधिकारी गोपाळ पाटील यांनी सांगितले. 

       प्रमुख वक्ते कृषी महाविद्यालय कोल्हापूरचे  प्रा. डॉ. अभयकुमार बागडे म्हणाले, ``महाराष्ट्रामधे चंदगड तालुका काजू उत्पादनासाठी नावाजलेला आहे.  येथे वर्षानुवर्षे पारंपारिक पद्धतीने काजू उत्पादन घेतले जाते. पण काजू उत्पादनामध्ये  आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब न केल्याने काजूचे उत्पादन कमी मिळते. कृषी विद्यापीठामध्ये संशोधित केलेले तंत्रज्ञान वापरून जास्तीत जास्त काजू उत्पादन शेतकऱ्यांना घ्यावे. काजू पिकावरील टी मॉस्किटो बग, स्टेम बोरर, मररोग इत्यादी कीड रोगांची ओळख व उपाय योजना बाबत सखोल मार्गदर्शन केले.

      यावेळी तालुका कृषी अधिकारी चंदगड अनिकेत माने यांनी काजू फळपीक लागवडीसाठी शासनाच्या उपलब्ध असलेल्या योजनांचा लाभ घेण्याविषयी शेतकऱ्यांना आवाहन केले. ठिबक सिंचन, शेततळे, प्रक्रिया उद्योग इत्यादी योजना विषयीही सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत शेतकरी गट स्थापन करणे, अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करणे इत्यादी बाबत चर्चा करण्यात आली.

       यावेळी बागिलगे गावचे कृषी सहाय्यक सुधाकर मुळे, बी. टी. एम. अभिजीत दावणे, कृषी पर्यवेक्षक संतोष खुटवड, सरपंच नरसू पाटील, सदानंद गणू पाटील, अनुसया पाटील, पुंडलिक पाटील, रामा पाटील, संपदा गुरव यांच्यासह बागिलगे, रामपूर, तांबुळवाडी, जट्टेवाडी, गुडेवाडी, वरगाव आदी गावचे ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदानंद पाटील यांनी केले तर आभार गणपत पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment