आंबोली घाटातून अवजड वाहतुकीस मनाई, चंदगड तालुक्यातील ट्रक वाहतूकदारांवर अन्याय ...! सार्व. बांधकाम मंत्र्यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

09 January 2024

आंबोली घाटातून अवजड वाहतुकीस मनाई, चंदगड तालुक्यातील ट्रक वाहतूकदारांवर अन्याय ...! सार्व. बांधकाम मंत्र्यांना निवेदन

 

सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांना आंबोली घाटातून अवजड वाहतुकीस परवानगी द्यावी या मागणीचे निवेदन देताना शिवाजीराव पाटील व वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

    कर्नाटकातील बेळगाव, विजापूर आदी जिल्ह्यांच्या परिसराला महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग व गोवा राज्याला जोडणाऱ्या आंबोली घाटातून गेली ३-४ वर्षे अवजड १०-१२ चाकी, २० टना वरील  ट्रक वाहतूक बंद करण्यात आली आहे. घाटातील एका कमकुवत पुलाचे कारण पुढे करून डिसेंबर २०२० मध्ये एका परिपत्रकाद्वारे ही बंदी घालण्यात आली होती. तथापि आता या पुलाचे काम २ वर्षापूर्वी पूर्ण झालेले असूनही ही बंदी तशीच पुढे सुरू ठेवली आहे. परिणामी  चंदगड तालुक्यातील ट्रक वाहतूकदारांना गोव्यात जाण्यासाठी चे अंतर २०-२५ किलोमीटर ऐवजी सुमारे १३० किलोमीटर पडत आहे. हा जादाचा फेरा मारून गोवा किंवा गोव्यातून बेळगाव व गडहिंग्लज भागात जावे लागत आहे. यामुळे चंदगड तालुक्यातील ट्रक  मालकांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे.

        ट्रकमालकांवर होणारा हा अन्याय दूर करून त्यांना आंबोली घाटातून वाहने नेण्यास मुभा द्यावी. तसेच सध्या तात्काळ रिकामी वाहने जा-ये करण्यास परवानगी द्यावी. कारण रिकामी वाहनांचे वजन केवळ दहा टनाच्या आसपास असते. अशा आशयाचे निवेदन भाजपा चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील व माजी रोहयो मंत्री भरमूआण्णा पाटील यांच्या पुढाकाराने सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांना नुकतेच देण्यात आले. मुंबई येथे निवेदन दिल्यानंतर याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन बांधकाम मंत्री यांनी शिष्टमंडळास दिल्याचे समजते. शिष्टमंडळात शिवाजीराव पाटील यांच्यासह ट्रक मालक संघटनेचे अध्यक्ष अशपाक नाईकवाडी, पप्पू नाईकवाडी, विनोद फाटक, फारुक शेरखान, मुस्ताक मुल्ला, सागर शेरेगार, प्रकाश शेरेगार आदींचा समावेश होता.

                      ट्रक मालकांवर उपासमारीची वेळ

चंदगड तालुक्यातील अनेक बेरोजगार तरुणांनी बॉक्साईट वाहतूक करण्यासाठी बँकांची कर्ज काढून ट्रक खरेदी केले आहेत. तथापि बॉक्साइट वाहतूक बंद झाल्याने त्यांच्यावर आधीच उपासमारीची वेळ आली असून बँकांचे व्याज फेडणेही डोईजड झाले आहे. बॉक्साईट बंदी नंतर कोकणातून चिरे, मेसकाठी, बांबू, लाकूड, वाळू यांच्या वाहतुकीचा आधार होता. तथापि आंबोली घाटातून   या वाहनांना बंदी घातल्याने ट्रक चालक मालकांवर पुन्हा उपासमारीची वेळ आली आहे. ब्रिटिश कालीन कमकुवत समजला जाणारा पूल आता नवीन बांधण्यात आल्याने अवजड वाहतुकीचा कोणताही धोका राहिलेला नाही. त्यामुळे येथून वाहतुकीस परवानगी मिळावी अशी रास्त मागणी वाहतूकदार संघटने कडून होत आहे.

No comments:

Post a Comment