विद्यार्थ्याच्या नवसर्जनाला प्रेरणा द्या : सुनील कोंडूसकर, 'आई शपथ खरं सांगतो ' संजय साबळेंच्या पुस्तकाचे प्रकाशन - चंदगड लाईव्ह न्युज

09 January 2024

विद्यार्थ्याच्या नवसर्जनाला प्रेरणा द्या : सुनील कोंडूसकर, 'आई शपथ खरं सांगतो ' संजय साबळेंच्या पुस्तकाचे प्रकाशन

 

'आई शपथ खरं सांगतो ' संजय साबळेंच्या पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी मान्यवर.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

      आजच्या धकाधकीच्या जीवनात आई-वडिलांना मुलांकडे विशेषता त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ मिळत नाही. साहजिकच मुले मोबाईल किंवा इतर वाईट संगतीला लागतात. त्याचे परिणाम पुढे जाणवू लागतात. आई वडील आपल्याला समजून घेत नाहीत याचा न्यूनगंड मुलांच्यात तयार होतो. ती विकृत किंवा चुकीचे वागू लागतात. त्यांच्या मनात कमीपणाची भावना निर्माण होते. मुले एकाकीपणाच्या कोशात जाऊ लागतात. हे दृष्टचक्र भेदायचे असेल तर त्यांना वेळीच घरी पालकांनी व शाळेत शिक्षकांनी समजून घ्यायला हवे. खरंतर शाळेतील वातावरण प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या वकूबाप्रमाणे अभिव्यक्त होता येईल इतकी सर्जनशील, संवेदनशील, बालस्नेही आणि आश्वासक हवे.

        'आई शपथ खरं सांगतो 'यातील सर्व लेख विद्यार्थ्यांचे आत्मानुभव आहेत . शालेय विद्यार्थ्यांच्या नव सर्जनाचा साक्षात्कार आहे "असे प्रतिपादन दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी सुनील कोंडुसकर यांनी केले. दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड येथील उपक्रमशील शिक्षक संजय साबळे यांनी संपादित केलेल्या 'आई शपथ खरं सांगतो ' या पुस्तक प्रकाशन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य एन. डी. देवळे होते.

      "विद्यार्थी दशेत आपल्याला  योग्य संस्काराचे वळण मिळाले तर आयुष्याचे चांगले दळण होऊन आपण यशस्वी होतो. 'शालेय अभ्यासक्रमा बरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगभूत कला गुणांना वाव देणे गरजेचे आहे. मुलांच्या अव्यक्त भावना व्यक्त करण्याची त्याना संधी दिल्यास त्यातून चांगले परिणाम दिसून येतील आणि  यातूनच 'आई शपथ खरं सांगतो' यासारखे पुस्तक निर्माण होते, असे प्रतिपादन प्राचार्य एन डी देवळे यांनी केले.

        विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक संजय साबळे यांनी मुलांना लिहिते करून त्यांच्या कडून त्यांच्या मनातील अव्यक्त घटना लिहायला सांगितल्या. व आई शपथ खरं सांगतो हे पुस्तक संपादित केले. यावेळी संजय साबळे म्हणाले' मुलांच्यावर अवती भोवती होणाऱ्या घटनाचा परिणाम होत असतो. या घटना शब्दबद्ध करण्यासाठी मुलाना प्रेरीत केले पाहिजे. यातूनच लेखन कौशल्य वाढीस लागते.'

           कार्यक्रमाला टी. एस. चांदेकर, एम. व्ही. कानूरकर, टी. टी. बेरडे, जे. जी. पाटील, एस. जे. शिंदे, व्ही. के. गावडे, व्ही. टी. पाटील, टी. व्ही. खंदाळे, सूरज तुपारे, शरद हदगल, पुष्पा सुतार, विद्या डोंगरे, वर्षा पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. आर. चिगरे यांनी केले.

No comments:

Post a Comment