संयम आणि सहनशीलता या सगळ्यात एक आयुष्य असते - कवी लक्ष्मण महाडिक - चंदगड लाईव्ह न्युज

17 January 2024

संयम आणि सहनशीलता या सगळ्यात एक आयुष्य असते - कवी लक्ष्मण महाडिक

चंदगड / प्रतिनिधी

        आजीच्या गोष्टी म्हणजे ज्ञानाचा खजिना होता.लोकगीते, ओव्या, म्हणी, गाणी या सगळ्यातली कवितेची शब्दयात्रा अखंड जागती ठेवा. बदलत्या काळाचे भान ठेवून आयुष्य नव्याने शोधत रहा. आजीच्या गोष्टी खूप व्यापकपणे येतात. अनेक अर्थाने पोषक असे संदर्भ आणि नोंदी त्या काळाचे जगणे मांडतात. स्त्री जीवनाचे तत्त्वज्ञान अधोरेखित करतात. जात्याची घरघर,चुलीचा जाळ, अर्धी भरलेली घागर, परिपूर्ण ज्ञान, संयम आणि सहनशीलता या सगळ्यात एक आयुष्य असते.गाणं आशयासह समजून घ्या.' असे प्रतिपादन जेष्ठ कवी प्रा. लक्ष्मण महाडिक (पिंपळगाव बसवंत, नाशिक) यांनी येथे केले. 

  दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालय,हलकर्णी (चंदगड ) येथील मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रमात 'कवितेची शब्दयात्रा ' या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर होते.प्रारंभी पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी केले. मान्यवरांचे स्वागत प्राचार्य व डॉ. अनिल गवळी यांनी केले.

   यावेळी कवी लक्ष्मण महाडिक यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्याना प्रबोधन करत कवितेची सफर घडवून आणली. अध्यक्ष प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर म्हणाले,' कवितेसाठी खूप वाचा. जीवनाची व्यापकता वाचन, विचार, चिंतन यात आहे. सर्वांगीण विकास ज्ञान संपादनात आहे.'यावेळी डॉ. जे. जे. व्हटकर, प्रा. जे.जी. गावडे, बाबासो कांबळे, इंजि.लेंगडे, आदी उपस्थित होते.आभार प्रा. अनंत कलजी यांनी मानले. 

No comments:

Post a Comment