र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये प्रतिपादन
मजरे शिरगाव येथे र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये मार्गदर्शन करताना न्यायाधीश चारुदत्त शिपकुले. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर ग्रुप ग्रामपंचायत मजरे शिरगाव, मौजे शिरगाव आणि इनाम सावर्डे या गावी संपन्न होत आहे. याप्रसंगी तिसरे पुष्प गुंपण्यासाठी चंदगड येथील प्रथम वर्ग न्यायाधीश श्रीयुत चारुदत्त शिपकुले व सहदिवाणी न्यायाधीश श्रीयुत वामन जाधव साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. व्यक्तीचा जन्म झाल्यापासून तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत कायदा हा सतत व्यक्तीचे जीवन चाकोरीबद्ध करत असतो. समाजामध्ये महिला-पुरुष त्यांच्या जीवनामध्ये विविध टप्प्यांमध्ये आणि वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये विविध कायद्याच्या परिघामध्ये वावरत असतात असे मत न्यायाधीश चारुदत्त शिपकुले यांनी व्यक्त केले.
कायदा हा मानव प्राण्यांबरोबरच निसर्गातील प्रत्येक घटकासाठी पारित केलेला आहे आणि निसर्गातील प्रत्येक घटक हा कायद्याच्या चौकटीमध्ये येतो असे मत सहदिवाणी न्यायाधीश वामन जाधव यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेडूत शिक्षण मंडळाचे संचालक ॲड. आर. पी. बांदिवडेकर होते.
समाजातील सर्व घटकांना कायद्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये स्वयंसेवकांना शारीरिक कष्टाबरोबरच बौद्धिक मार्गदर्शन हे अतिशय महत्त्वाचे असते आणि त्यातच कायदेविषयक मार्गदर्शन हे त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला उपयोगी पडेल म्हणून आजचा हा कायदेविषयक मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केल्याचे प्रतिपादन आपल्या प्रास्ताविकामध्ये डॉ. एन. के. पाटील यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जागृती गिलबिले हिने केले तर आभार सौरभ गावडे यांनी मानले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. एस. एन. पाटील, डॉ. एन. के. पाटील, प्रा. ए. डी. कांबळे, प्रा. व्ही. के. गावडे, डॉ. एस. डी. गावडे, प्रा. एम. एस. दिवटे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री नारायण हसबे, अशोक सरोळकर, राजाराम वाके, परशराम गावडे, मोहन कांबळे, एकनाथ वाके, आकाश कांबळे व शिरगाव गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment