अतुलनीय योद्धा व आदर्श राजा म्हणून जगाच्या इतिहासात शिवरायांची नोंद : प्राचार्य डॉ. पठाण - चंदगड लाईव्ह न्युज

21 January 2024

अतुलनीय योद्धा व आदर्श राजा म्हणून जगाच्या इतिहासात शिवरायांची नोंद : प्राचार्य डॉ. पठाण

 


चंदगड / प्रतिनिधी
       अतुलनीय योद्धा व आदर्श राजा म्हणून जगाच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांची नोंद घेतली जाते. शिवरायांनी आपणास स्वाभिमान शिकवला तर संभाजीराजांनी स्वाभिमानाने कसे जगावे हे शिकविले. शिवाजी महाराज केवळ राजे नव्हते तर ते एक आदर्श मातृपितृभक्त, कुशल संघटक, अभ्यासू आणि स्वराज्याचे निर्माते होते, असे प्रतिपादन डॉ. इस्माईल पठाण यांनी केले. हलकर्णी  ता.चंदगड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ पुरस्कृत मराठा इतिहास व्याख्यानमालेत 'छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा' या विषयावर ते बोलत होते. यावर्षी राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने सदर व्याख्यानमाला महाविद्यालयात आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील होते.

डॉ. पठाण आपल्या भाषणात पुढे म्हणाले, राज्याभिषेक झाल्यामुळे शिवाजी महाराज छत्रपती झाले. त्यांना राजा म्हणून मान्यता मिळाली. त्यांनी स्वराज्याच्या नावे नाणी छापली. तसेच शिवशक सुरू केले. रयतेने त्यांना आदराने शिवराय ही पदवी दिली. सोळाशे सत्तर पासूनच शिवाजी महाराजांच्या मनामध्ये राज्याभिषेक करून घेण्याची कल्पना घोळत होती. कारण तत्कालीन राज्यकारभारामध्ये त्यांना अनेक अडचणी येत होत्या. राजा म्हणून छत्र धारण केले नसल्यामुळे जहागीरदार व इतर छोटे मोठे सरदार शिरजोरी करीत होते. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे करारनामे, हुकूम करताना त्यांना अडचणी येत होत्या. जावळीचे चंद्रराव मोरे सुद्धा त्या काळात स्वतःला मोठे समजत होते. त्यामुळे या सर्व अडचणी लक्षात घेऊन शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला. या शब्दात त्यांनी राज्याभिषेकाची आवश्यकता पटवून दिली त्यानंतर श्रोत्यांच्या नजरेसमोर त्यांनी सदर सोहळा चित्रमय उभा केला.अध्यक्षीय भाषणात गोपाळराव पाटील यांनी राजधानीसाठी शिवाजी महाराजांनी रायगडची निवड किती दूरदृष्टीने केली होती, हे प्रतिपादन केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. अशोकराव जाधव, उपाध्यक्ष मा. संजय पाटील, सचिव मा. विशाल पाटील, प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर तसेच डॉ. जयवंत व्हटकर, महादेव वांद्रे, उमर पाटील, प्रा. आर. डी. कांबळे आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी वर्ग, विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. व्याख्यानमालेचे संयोजन डॉ. अनिल गवळी यांनी केले.पाहुण्यांचा परिचय डॉ. ज्योती व्हटकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी केले. आभार डॉ. मधुकर जाधव यांनी मानले.

No comments:

Post a Comment