![]() |
निवासी शिबिरामध्ये शासकीय कृषी योजना व सुधारित शेती यावरती मार्गदर्शन कृषी अधिकारी अनिकेत अरुण माने |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
र. भा. माडखोलकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर ग्रुप ग्रामपंचायत मजरे शिरगाव, मौजे शिरगाव आणि इनाम सावर्डे या गावी संपन्न होत आहे. या शिबिराच्या निमित्ताने आयोजित पाचव्या दिवशीच्या कार्यक्रमांमध्ये चंदगड तालुक्याचे कृषी अधिकारी अनिकेत अरुण माने यांनी शासकीय कृषी योजना आणि सुधारित शेती तंत्र या विषयावरती मार्गदर्शन केले.
उपस्थित शेतकरी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांना संबोधित करीत असताना ते म्हणाले की शेती व्यवसाय हा पारंपारिक पद्धतीने न करता त्यामध्ये आधुनिकीकरण आणल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा जास्त होईल. त्यांनी भात आणि ऊस या दोन पिकांची उदाहरणे घेऊन ती आधुनिकीकरणाच्या पद्धतीने कशी करता येतील व अधिक उत्पन्न कसे मिळवता येईल यावरती सखोल अशी चर्चा केली. शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांमध्ये शेततळ्यासारख्या योजनांचा फायदा कसा घेता येईल, त्याचबरोबर फळ बागायत लागवडीसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला व त्यासाठी शेतकऱ्यांनी कसे अर्ज करावेत त्याची नेमकी प्रक्रिया काय आहे आणि आपल्याला किती अनुदान भेटेल याविषयी मार्गदर्शन केले.
मंडळ कृषी अधिकारी दीपक फडतरे यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना प्रत्येकाला आपण ज्या भूमीवरती राहतो. त्या भूमीचा सात-बारा वाचन करता येणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. यानंतर त्यांनी ऊस शेतीचे अर्थशास्त्र उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दिलीप रामू वाके होते. विविध शासकीय योजनांपासून शेतकरी अनभिज्ञ असतो, तसेच शासकीय कार्यालयात जाऊन शासकीय अधिकाऱ्यांशी बोलणे किंवा शासकीय योजनांची माहिती घेणे हे बऱ्याचशा शेतकरी बांधवांना जमत नाही. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण गावातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती मिळाली असे ते म्हणाले. त्यानंतर रात्री जादूगर शालिमार यांचे जादूचे प्रयोग दाखविण्यात आले. जादूच्या प्रयोगातून चमत्कार व अंधश्रद्धा यावर भाष्य करून उपस्थित प्रेक्षकांचे मनोरंजनाबरोबरच प्रबोधन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी डॉ. एस. एन. पाटील, डॉ. एन. के. पाटील, प्रा. ए. डी. कांबळे, प्रा. व्ही. के. गावडे, डॉ. एस. डी. गावडे, डॉ. ए. पी. पाटील, सौ. प्रमिला संजय पाटील, पांडुरंग फाटक, निंगाप्पा भादवणकर, गोपाळ वाके, विश्राम सासुरकर, महादेव सूर्यवंशी, श्रीपाद सामंत आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृती वाके हिने केले. प्रास्ताविक अनुराधा पाटील हिने केले तर आभार अंकिता कदम हिने मानले.
No comments:
Post a Comment