बुक्कीहाळ बुद्रुक येथील डॉ. विनोद कोकितकर यांची 'एमडी मेडिसिन' पदवी पर्यंत झेप - चंदगड लाईव्ह न्युज

02 January 2024

बुक्कीहाळ बुद्रुक येथील डॉ. विनोद कोकितकर यांची 'एमडी मेडिसिन' पदवी पर्यंत झेप

डॉ. विनोद सोनाप्पा कोकितकर

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
      काही वर्षांपूर्वीपर्यंत शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या दुर्गम, डोंगराळ व बहुतांशी कन्नड भाषिक बुक्कीहाळ बुद्रुक (ता. चंदगड) गावातून डॉ. विनोद सोनाप्पा कोकितकर या तरुणाने 'एम डी मेडिसिन (आयुर्वेदिक)' पदवीपर्यंत झेप घेत भागातील तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
  आर्यंग्ला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा येथून बी. ए. एम. एस. पदवी प्राप्त केल्यानंतर विनोद यांनी २०२१ मध्ये ऑल इंडिया ४८४१ वी रँक प्राप्त करत केएलई या नामांकित विद्यापीठात प्रवेश मिळवला. सध्या तो केएलई रुग्णालय बेळगाव येथे कार्यरत आहे. कोविड काळात कोविड हॉस्पिटल सातारा येथे  उत्कृष्ट सेवा बजावत रुग्णव नातेवाईकांची मने जिंकली होती.
     डॉ. विनोद चे  पहिली ते चौथी प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर बुक्कीहाळ येथे, पाचवी ते सातवी विद्यामंदिर राजगोळी बुद्रुक, आठवी ते दहावी व्ही. के. चव्हाण-पाटील विद्यालय कागणी, अकरावी- बारावी व्ही. पी. देसाई जुनियर कॉलेज कोवाड व त्यानंतर बी. ए. एम. एस. सातारा येथे पूर्ण केले. त्याला प्राथमिक शिक्षक असलेले वडील सोनाप्पा कोकितकर, आई सौ. वनिता व कुटुंबीयांचे प्रोत्साहन तर  'एमडी' होण्यासाठी डॉ. बी. आर. तुबकी, डॉ. काशव्वा हिरेमठ आदींचे मार्गदर्शन लाभले. 
  त्याने आपल्या दुर्गम गावातील लोकांच्या सेवेसाठी बुक्कीहाळ येथे ओपीडी सुरू केली असून तालुक्यातील कोवाड, ढोलगरवाडी, पाटणे फाटा या ठिकाणी ओपीडी सुरू करावी अशी मागणी होत आहे. के. एल. ई. विद्यापीठ त्याला मेडिकल ऑफिसर  म्हणून सामावून घेण्यासाठी इच्छुक आहे.
       शिक्षक सोनाप्पा कोकीतकर यांची मोठी मुलगी सौ. प्रतीक्षा बीएएमएस असून गोवा येथे प्रॉडक्शन ऑफिसर म्हणून कार्यरत असून लहान मुलगी पौर्णिमा ही सावंतवाडी येथे बीएएमएस अंतिम वर्षात शिकत आहे. शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेल्या गावात वावरत असताना सुद्धा डॉक्टर विनोदचे यश नक्कीच नजरेत भरणारे आहे. त्याच्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment