आजी-आजोबा हयात आहेत ती नातवंडे भाग्यशाली, सन्मानामुळे वृद्धांची जगण्यातील ऊर्मी वाढेल ...! -श्रीकांत पाटील, राजगोळी खुर्द हायस्कूलमध्ये आजी-आजोबांचा सन्मान - चंदगड लाईव्ह न्युज

22 January 2024

आजी-आजोबा हयात आहेत ती नातवंडे भाग्यशाली, सन्मानामुळे वृद्धांची जगण्यातील ऊर्मी वाढेल ...! -श्रीकांत पाटील, राजगोळी खुर्द हायस्कूलमध्ये आजी-आजोबांचा सन्मान

राजगोळी खुर्द (ता. चंदगड) हायस्कूल राजगोळी खुर्द येथे आजी आजोबा सन्मान सोहळा प्रसंगी त्यांचे पूजन करताना नातवंडे व उपस्थित मान्यवर.

कुदनूर : सी एल वृत्तसेवा
     सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे आई वडील आपल्या मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत परिणामी कुटुंबात आजी-आजोबांचे असणे नातवंडांसाठी अनन्यसाधारण ठरते. आजी आजोबा नातवंडांना भाषा, संस्कृती व अनुभवामृत देणारी एक लायब्ररीच असते. त्यांना सन्मानपूर्वक वागवल्यास त्यांची जगण्याची उर्मी वाढेल. असे प्रतिपादन चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील  (कालकुंद्री) यांनी केले. ते राजगोळी खुर्द हायस्कूल (ता चंदगड) येथे आजी, आजोबा सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी गावातील वयोवृद्ध आजोबा निंगाप्पा धोंडीबा पाटील हे होते.
   सुरवातीस प्र मुख्याध्यापक पी बी कवठेकर यांनी स्वागत तर राघवेंद्र जी इनामदार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पुढे बोलताना श्रीकांत पाटील म्हणाले ज्यांचे आजी आजोबा हयात आहेत अशी नातवंडे भाग्यवान समजली पाहिजे. या जुन्या पिढीकडील अनुभवातून आपल्याला समृद्ध व्हायचे असेल तर त्यांना सन्मानपूर्वक वागवून आनंदी ठेवले पाहिजे. राजगोळी हायस्कूल आयोजित अशा सन्मान सोहळ्यांमुळे वृद्धांची जगण्याची उर्मी निश्चित वाढेल. असे सांगताना 'आजी आजोबा दिन' कसा, केव्हा व का सुरू झाला..? याबद्दलची माहिती उपस्थितांना दिली. 
 यावेळी कल्लाप्पा डुक्कुरवाडकर आदी वृद्धांनी मनोगते व्यक्त केली. पुरोहित अथर्व अत्रे (दड्डी) यांनी आजी आजोबांच्या सन्मानार्थ म्हटलेल्या मंत्रोच्चारात शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या आजी-आजोबांची पाद्य पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी उपस्थित सुमारे शंभर आजी- आजोबांचा शाळेच्या वतीने वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यापक जगन्नाथ बर्वे यांनी केले. किरण आदगोंडा पाटील यांनी आभार मानले.


No comments:

Post a Comment