प्राध्यापक, कृषी व पत्रकार संघांची विजयी सलामी...! 'पत्रकार, ऑफिसर्स क्रिकेट लीग २०२४' स्पर्धेचा थरार' सुरू - चंदगड लाईव्ह न्युज

07 January 2024

प्राध्यापक, कृषी व पत्रकार संघांची विजयी सलामी...! 'पत्रकार, ऑफिसर्स क्रिकेट लीग २०२४' स्पर्धेचा थरार' सुरू

पत्रकार संघ आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करताना न्यायाधीश चारुदत्त शिपकुले

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
      मराठी पत्रकार परिषद मुंबई, संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघ आयोजित 'पत्रकार, ऑफिसर्स, सोशल वर्कर्स क्रिकेट लीग २०२४' स्पर्धेचा थरार आज रविवार दि ७ जानेवारी २०२४ पासून सुरू झाला. इंडॉल क्रीडांगणावर (बेळगाव- वेंगुर्ला हायवे, हिंडगाव फाटा) सुरू असलेल्या स्पर्धेत पहिल्याच दिवशी थरारक सामने पाहायला मिळाले.


    उद्घाटनाच्या सामन्यात न्यायालय व वकील टीमने प्रथम फलंदाजी करून ८ षटकात ३ गडी बाद ७० पर्यंत मजल मारली तर कृषी विभागाने ६ व्या षटकात ३ गडी बाद ७१ धावा करत विजय मिळवला.
लोकमान्य पतसंस्था बेळगाव यांच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त सन्मानपत्राच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्या.
    दुसऱ्या सामन्यात गतवर्षीचा उपविजेता खेडूत स्पोर्ट्स ला प्राध्यापक संघाने पराभवाचा धक्का दिला. प्रथम फलंदाजी करताना प्राध्यापक संघाने ८ षटकात ४ गडी बाद ७६ धावा केल्या. खेडूत स्पोर्ट्स संघाला ८ षटकात ७ गडी बाद ४५ धावा पर्यंतच मजल मारता आली.

     आजच्या शेवटच्या सामन्यात चंदगड पत्रकार संघाने न्यायालय संघाचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ६ षटकांच्या या सामन्यात पत्रकार संघाने १ गडी बाद ८५ धावांचा डोंगर उभा केला. उत्तरादाखल न्यायालय टीम ५ गड्यांच्या मोबदल्यात ५२ धावा पर्यंत मजल मारू शकली. अशाप्रकारे तीन संघांनी पहिल्या दिवशी विजय सलामी दिली.

     सकाळी स्पर्धेचे उद्घाटन चंदगड न्यायालयाचे न्यायाधीश माननीय चारुदत्त शिपकुले यांच्या अध्यक्षतेखाली व हस्ते पार पडले. पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील व उपाध्यक्ष संतोष सावंत भोसले यांनी स्वागत केले. प्रास्ताविक सी. एल. न्यूज चॅनेलचे संपादक संपत पाटील यांनी केले. यावेळी बोलताना न्यायाधीश शिपकुले यांनी "चंदगड पत्रकार संघाने अधिकारी व कर्मचारी यांना प्रशासकीय कामातून विरंगुळा व आनंद देण्यासाठी 'एक धाव आरोग्यासाठी' हे ब्रीदवाक्य घेऊन आयोजित केलेल्या स्पर्धेचे कौतुक करताना सर्व शासकीय निमशासकीय व सहकार क्षेत्रातील कर्मचारी यांनी या स्पर्धेचा खिलाडू वृत्तीने आनंद घ्यावा असे आवाहन केले."

 यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले चंदगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अली मुल्ला यांनी आपण पोलीस सेवेत  आल्यापासून सहा जिल्ह्यांमध्ये सेवा बजावली आहे. तथापि पत्रकारांच्या माध्यमातून घेतली जाणारी अशा प्रकारची ३२-३४ संघांचा सहभाग असलेली स्पर्धा आपण प्रथमच पाहतोय असे गौरवोद्गार काढले. 
   अशा स्पर्धांमुळे  विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना एकमेकांच्या ओळखी वाढविण्यास मदत होण्याबरोबरच प्रशासकीय काम अधिक जोमाने करण्यासाठी नवी ऊर्जा मिळेल असे प्रतिपादन केले. 

    या प्रसंगी उद्योजक सुनील काणेकर, नगरसेवक बाळासाहेब हळदणकर यांनी मनोगते व्यक्त केली. पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष उदयकुमार देशपांडे, कृषी सहाय्यक गणेश गायकवाड, लोकमान्य पतसंस्थेचे सहाय्यक व्यवस्थापक शाखा व्यवस्थापक रमेश देसाई, माजी सभापती ॲड. ए. एस. कांबळे, शांतारामबापू पाटील यांच्यासह सहभागी विविध संघातील अधिकारी कर्मचारी तसेच पत्रकार संघाचे सदस्य संतोष सुतार, प्रकाश ऐनापुरे,  संजय मष्णू पाटील, जोतिबा पाटील, सागर चौगुले, विश्वास पाटील, राहुल पाटील, उत्तम पाटील आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन पत्रकार चेतन शेरेगार यांनी केले. पत्रकार संघ अंतर्गत डिजिटल मीडिया विभागाचे अध्यक्ष महेश बसापुरे यांनी आभार मानले. 

      प्राध्यापक वॉरियर्स व खेडूत स्पोर्ट्स यांच्यात सामना सुरू असताना भाजपा चंदगड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी इंडॉल ग्राउंडवर भेट देऊन चंदगड तालुका पत्रकार संघाला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर झालेला न्यायालय व पत्रकार यांच्यातील सामनाचाही त्यांनी आनंद लुटला. त्यांच्यासोबत भाजपचे माजी तालुकाध्यक्ष नामदेव पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांचे स्वागत पत्रकार संघाचे सचिव शेरेगार यांनी केले.


No comments:

Post a Comment