माडखोलकर महाविद्यालयाच्या निवासी शिबिरामध्ये पशु चिकित्सा शिबिर व पशुधन काळजी मार्गदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

27 January 2024

माडखोलकर महाविद्यालयाच्या निवासी शिबिरामध्ये पशु चिकित्सा शिबिर व पशुधन काळजी मार्गदर्शनचंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    र. भा. माडखोलकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर मजरे शिरगाव येथे संपन्न होत आहे. या शिबिराच्या सहाव्या दिवशी शेतकरी बांधवांना शिबिराच्या माध्यमातून अधिक मदत करता यावी यासाठी पशुचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याच्या गोकुळ संघाचे मुख्य अधिकारी डॉ. प्रकाश साळुंखे सर यांना आमंत्रित करण्यात आले होते. 

     दुपारी ३ वाजल्यापासून ते रात्री ७ वाजेपर्यंत मजरे शिरगाव गावातील एकूण २२ शेतकऱ्यांच्या जवळपास ४० जनावरांची यावेळी त्यांनी मोफत तपासणी केली व त्यांच्या वरती औषधोपचार केले. यानंतर आयोजित कार्यक्रमांमध्ये बोलत असताना त्यांनी पशुधनाची काळजी कशी घ्यावी या विषयावरती मार्गदर्शन केले. शेतीशी पूरक व्यवसाय म्हणून बरेचसे शेतकरी गाई म्हशी पाळतात आणि आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना गाई म्हशी हा मुख्य व्यवसाय वाटू लागला आहे. परंतु आपल्याजवळ असणाऱ्या दुभत्या जनावरांची काळजी कशी घ्यावी. याबाबत बरेचसे शेतकरी अनभिज्ञ असतात. जनावरांना चारा कधी घालावा, तो चारा कोणत्या प्रकारचा असावा, त्यांना पाणी कोणत्या वेळी द्यावे याविषयी सखोल मार्गदर्शन त्यांनी केले. 

     काही वेळेस जनावर आजारी असते, बरीचशी लक्षणे ही बाह्य असली तर ती ओळखू येतात पण काही लक्षणे ओळखू येत नाहीत अशी लक्षणे कशी ओळखावीत याविषयी ते बोलले. योग्य पद्धतीने गाई म्हशींची काळजी घेतली तर प्रत्येक डेरी च्या दुधामध्ये 100 लिटरने नक्कीच वाढ झाली आहे असेही ते म्हणाले.

       या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैभवी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन अंकुश मुळीक होते. त्यांनी शेतीशी पूरक असलेला हा गाई म्हशींचा व्यवसाय भरघोस आर्थिक उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय आहे. आपल्या जनावरांची जर योग्य काळजी वेळीच घेतली तर आपल्याला नक्कीच फायदा होतो असे सांगितले. 

        यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी डॉ. एस. एन. पाटील, डॉ. एन. के. पाटील, डॉ. एस. डी. गावडे, प्रा. ए. डी. कांबळे, डॉ. एन. एस. मासाळ, प्रा. व्ही. के. गावडे, डॉ. ए. पी. पाटील, सौ. प्रमिला संजय पाटील, श्रीपाद सामंत, गोपाळ गावरे, मनोहर गावडे, अंकुश गावडे, यशवंत सरोळकर, अंकुश अधकारी, विश्वास सावंत व मौजे शिरगाव गावचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा गावडे व आदित्य सुतार यांनी केले. पाहुण्यांची ओळख उज्वला मुळीक हिने करून दिली तर आभार अंकिता गावडे हिने मानले.

No comments:

Post a Comment