अरबी समुद्रात शिवस्मारक उभारणीचे काय झाले...? - संतोष पाटील
मराठा सेवा संघ बेळगाव जिल्हा आयोजित शिवजयंती उत्सव प्रसंगी व्याख्यान देताना शिवश्री रवींद्र खैरे |
बेळगाव : सी. एल. वृत्तसेवा
अंधश्रद्धेचा पगडा आणि आर्थिक साक्षरतेचा अभाव हे मराठा समाजाचे खरे शत्रू आहेत. खिशात पैसे नसताना मराठी माणूस लग्न, यात्रा, जत्रा, उत्सवात पैसा उडवतो. याचे कारण समाजातील अंधश्रद्धा आणि आर्थिक साक्षरतेचा अभाव हे आहे. कर्जबाजारीपणामुळे शेती घरे विकण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे असे परखड मत प्रसिद्ध वक्ते चंद्रकांत खैरे (व्यावसायिक मार्गदर्शक, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र कोल्हापूर) यांनी व्यक्त केले. ते बेळगाव जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने वडगाव- बेळगाव येथे शिवजयंती उत्सव व मराठा समाजातील विधुर, विधवा, घटस्फोटीत महिला पुरुषांच्या विवाह परिचय मेळाव्यात 'मराठा समाजापुढील सामाजिक आव्हाने' विषयावर व्याख्यान देत होते. अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक व उद्योजक मोहन भांदुर्गे होते.
मराठा सेवा संघ बेळगाव जिल्हा आयोजित शिवजयंती उत्सव प्रसंगी व्याख्यान देताना शिवश्री संतोष पाटील |
दीप प्रज्वलन करताना चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील सोबत डावीकडून किरण धामणेकर, रवींद्र खैरे, संतोष पाटील, नारायण सांगावकर |
यावेळी दुसरे प्रसिद्ध व्याख्याते संतोष प्रकाश पाटील (संचालक तेज अकॅडमी निपाणी) यांनी शिवअंगार काव्यातून छत्रपतींचा इतिहास उभा केला. शिवरायांनी बांधलेले ३६० किल्ले हे त्यांची जीवंत स्मारके आहेत. असे सांगताना सन २०१४ मध्ये निवडून आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरबी समुद्रात छत्रपतींचे स्मारक बांधण्यासाठी समुद्र पूजन केले होते. त्या स्मारकाचे काय झाले? असा घाणाघाती सवाल केला. छत्रपती शिवरायांच्या गुरु या केवळ राजमाता जिजाऊ याच होत्या. अलीकडील काळात समर्थ रामदास यांना त्यांचा गुरु म्हणून 'प्रमोट' करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठा समाजाने याबाबत दक्ष राहून हा प्रयत्न हाणून पडला पाहिजे असे सांगितले.
यावेळी उद्योजक मोहन भांदुर्गे, महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव चे युवा अध्यक्ष अंकुश केसरकर, चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील आदींची भाषणे झाली. यावेळी उद्योजक शिवश्री जी आर शिरोळकर, यल्लाप्पा रेमाणीचे ग्रामपंचायत सदस्य व उद्योजक धामणे, प्रा मायाप्पा पाटील, साप्ताहिक सत्य घटना चे संपादक राहुल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मराठा समाजातील विवाह इच्छुक वयस्कर तरुण, विधुर, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत स्त्री-पुरुष व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण सांगावकर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment