उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने मोफत आरोग्य व नेत्ररोग तपासणी शिबिरांचा रुग्णांना लाभ - चंदगड लाईव्ह न्युज

22 February 2024

उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने मोफत आरोग्य व नेत्ररोग तपासणी शिबिरांचा रुग्णांना लाभकोवाड : सी. एल. वृत्तसेवा
  उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने चंदगड तालुक्यात शिवजयंतीचे औचित्य साधून आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहातील मोफत शिबिरात रुग्णांची जनरल तपासणी, रक्तदाब तसेच डोळ्यांचे रोग व चष्मा याबाबत उपचार (मोफत औषधे व चष्मा वाटप) केले जात आहेत. 

   आरोग्य शिबिर सप्ताहाची सुरुवात शिवजयंती निमित्त १९ फेब्रुवारी रोजी नागरदळे ग्रामपंचायत (ता. चंदगड) येथे करण्यात आली. दि. २० रोजी वाचनालय कालकुंद्री येथे, २१ रोजी ग्रामपंचायत कडलगे बुद्रुक येथे, २२ रोजी ओम मेडिकल निट्टूर रोड, कोवाड येथे पार पडले. याशिवाय २३ रोजी भावेश्वरी मंदिर निटूर, २४ रोजी ग्रामपंचायत कार्यालय घुल्लेवाडी येथे, तर २५ रोजी हनुमान मंदिर तेऊरवाडी येथे सांगता होणार आहे. रोज सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे तपासणी शिबिर सुरू राहणार असून याचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा. असे आवाहन तालुका प्रमुख लक्ष्मण शिवाजी मनमाडकर व अनिल गुंडोपंत दळवी यांनी केले आहे.
  कालकुंद्री येथे ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय येथे झालेल्या शिबिराचे उद्घाटन उद्धव ठाकरे शिवसेना बेळगाव जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोडकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी या लोकाभिमुख उपक्रमाचे कौतुक करून याचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे आवाहन केले. यावेळी कालकुंद्री तंटामुक्त कमिटी अध्यक्ष पुंडलिक जोशी, कलमेश्वर मंदिर जिर्णोद्धार कमिटी अध्यक्ष मनोहर पाटील तसेच शिवसेना शाखेचे सर्व सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment