कालकुंद्री- कुदनूर शिवारात टस्कर हत्तीची दहशत - चंदगड लाईव्ह न्युज

24 February 2024

कालकुंद्री- कुदनूर शिवारात टस्कर हत्तीची दहशत

टस्कर हत्ती दुपारी कुदनूर- किटवाड रस्ता परिसरात दिसला तेव्हा घेतलेले छायाचित्र

कुदनूर : सी. एल. वृत्तसेवा

     कालकुंद्री (ता. चंदगड) शिवारात किटवाड धरण परिसरात आज दि. २४ रोजी सकाळी टस्कर हत्तीचे दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सकाळी ७ वाजता हा हत्ती कालकुंद्री चे माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष अशोक तुकाराम पाटील यांनी पाहिला. प्रचंड आकार व दीड फूट लांबीचे सुळे असल्याचे त्यांनी सांगितले. सकाळी काही वेळ हत्तीने कुंबरी शेत परिसरातील नरसु रामू तेऊरवाडकर यांच्या उसाच्या फडात विश्रांती घेतली होती. तथापि अतिउत्साही लोकांच्या हुल्लडबाजीमुळे हत्ती बिथरून पुन्हा कुदनूर हद्दीत किटवाड धरण क्र. २ सांडवा परिसरात घुटमळत होता. या घटनेमुळे परिसरातील कालकुंद्री, कुदनूर, किटवाड ग्रामस्थ सतर्क झाले असून दवंडी व स्पीकर वरून शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी हत्तीला त्रास देऊ नये अशा प्रकारच्या सूचना दिल्या जात आहेत.

   आज सकाळी एकच हत्ती दृष्टीस पडला असला तरी काल रात्री चिंचणे परिसरात काही लोकांनी दोन हत्ती पाहिल्याचे म्हटले आहे. यावरून हत्ती तेऊरवाडी, कामेवाडी जंगलातून ताम्रपर्णी नदी पार करून कुदनूर ओढ्याच्या समांतर शिवारातून किटवाड धरण परिसरात आल्याचे स्पष्ट होत आहे. आज पहाटे कुदनूर येथील टोळी ऊस तोडणी साठी तांदळे काट्याकडे चालली होती. त्यांना हत्ती कुदनूर ओढ्यातून पुढे सरकत कालकुंद्री हद्दीत वारीच्या दिशेने जाताना दिसल्याचे प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले. त्यानंतरच ऊळीचे टेक येथे हा हत्ती अशोक पाटील यांना दिसला असावा. तथापि यातील एक हत्ती नंतर कुणाला दिसलेला नसला तरी दोन हत्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या या परिसरात ऊस तोडणी साठी किमान ४-५ कारखान्यांच्या टोळ्या कार्यरत आहेत. स्थानिक व बाहेरून आलेल्या टोळ्यांमध्ये यामुळे घबराटीचे वातावरण असून ऊस तोडणीचे काय करावे या संभ्रमात शेतकरी व तोडणी कामगार आहेत. दरम्यान दुपारी साडेअकरा वाजता कुदनूर किटवाड मार्गानजिक हत्ती आला असताना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी येऊन जमलेल्या जमावाला दुपारी हत्तीची विश्रांतीची वेळ असल्याने हत्ती बिथरेल असे वर्तन करू नका असे सांगून पांगवण्याचा प्रयत्न केला. याबाबत वन विभागाने तात्काळ उपायोजना करावी अशी मागणी होत आहे.


No comments:

Post a Comment