कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक पारगड वर नरवीर तानाजी मालुसरे यांचे पुत्र तथा किल्ल्याचे पहिले किल्लेदार रायबा ऊर्फ रायाजी मालुसरे यांचा जगातील पहिला पुतळा व स्मारकाचे उद्घाटन काल दि. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी अपूर्व उत्साहात पार पडले. दुर्गप्रेमी, शिवभक्त तसेच मालुसरे कुटुंबीयांच्या देणगी व परिश्रमातून हे स्मारक उभारण्यात आले आहे.
सकाळी स्मारक स्थळापासून छ. शिवरायांच्या प्रतिमेची भवानी मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, सदर, महादेव मंदिर, हनुमान मंदिर ते परत स्मारक स्थळ अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तानाजी मालुसरे तथा रायबा मालुसरे यांचे वंशज. तसेच कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी असलेल्या सरदार घराण्यातील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज जयाजीराव मोहिते, सरदार कमळोजी साळुंखे यांचे वंशज सुहास दादा साळुंखे, तानाजी यांचे बंधू सूर्याजी मालुसरे यांचे वंशज अनिल मालुसरे, गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांचे वंशज दादाराम नाईक, सरदार बालाजी डुबल यांचे वंशज रघुनाथदादा डुबल आदींनी छत्रपतींची पालखी वाहिली. स्मारका समोरील भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मालुसरे व इतर सर्व सरदार घराण्यातील वंशज यांच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन झाले. किल्लेदार सुभेदार रायबा मालुसरे यांच्या अर्धपुतळ्याचे पूजन आमदार राजेश पाटील, माजी रोहयो मंत्री भरमूआण्णा पाटील, भाजप चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील, कान्होबा माळवे, रघुवीर शेलार, सुनील मालुसरे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रास्ताविक अनिल मालुसरे यांनी केले. यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी स्मारक स्थळ परिसर सुशोभीकरण तसेच स्मारकाकडे येणारा रस्ता आदींसाठी आपण १५ लाख रुपये निधी देत असून याबाबतचा प्रस्ताव व आराखडा लवकर तयार करून पाठवा असे सांगितले. ऐतिहासिक वारसा स्थळांच्या ठिकाणी बार संस्कृती रुजणार नाही यासाठी सर्वांनी जागरूक राहावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
यावेळी तानाजी मालुसरे यांचे वंशज वयोवृद्ध मनोरमा सिताराम मालुसरे, सदाशिव मालुसरे, रामचंद्र मालुसरे, विलास मालुसरे, प्रशांत मालुसरे व कुटुंबीय, चंदगड पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, नगरसेवक अभिजीत गुरबे ग्रामस्थ बिपिन चिरमुरे, विलास आडाव, धोंडीबा बेर्डे, प्रकाश चिरमुरे, विठ्ठल शिंदे, आदींसह पंचक्रोशी व तालुक्यातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्मारक लोकार्पण कार्यक्रमानंतर भवानी मंदिर येथे विंझणे येथील शिवशाहीर नामदेव निकम यांच्या शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम व अखलाक मुजावर (महागाव) यांचे व्याख्यान झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुंडलिक भोगण, अनिकेत घाटगे, गंगाराम पाथरवट, संतोष मालुसरे, अभिजीत मांगले, गोविंद मासरणकर, निवृत्ती कुट्रे, रमेश देसाई आदींसह र भा माडखोलकर महाविद्यालय चंदगड, व्ही के चव्हाण महाविद्यालय पाटणे फाटा, धनंजय विद्यालय व संजय गांधी विद्यालय नागनवाडी, रवळनाथ विद्यालय चंदगड येथील विद्यार्थी, शिवप्रतिष्ठान तसेच सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गप्रेमी यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment