![]() |
| सुमित परशराम पाटील |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
तिलारी नगर- दोडामार्ग मार्गावर वायंगणतड गावानजीक झालेल्या कार दुचाकी अपघातात दुचाकी वरील कालकुंद्री (ता. चंदगड) येथील एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला आहे. ही हृदयद्रावक घटना काल दि. ०३/०३/२०२४ रोजी रात्री ८.१५ च्या सुमारास घडली.
कालकुंद्री येथील तरुण सुमित परशराम पाटील वय २६ व ओमकार विठ्ठल पाटील २५ हे कालकुंद्री येथून पाटणे फाटा, तिलारी नगर घाटातून दोडामार्ग मार्गे कामानिमित्त गोव्याला निघाले होते. यावेळी कोल्हापूर येथे देवदर्शन आटोपून म्हापसा गोवा येथील कुटुंब परत चालले होते. पुढे जाणाऱ्या कारला ओव्हरटेक करत असताना कारचा धक्का बसून दोघेही दुचाकीसह दोघेही बाजूला फेकले गेले. यात मागे बसलेल्या सुमितच्या डोक्याला धक्का बसून तो गंभीर जखमी झाला. तथापि दुचाकी चालक ओमकार हा किरकोळ जखमी झाला, हेल्मेट असल्याने तो बचावला. दोघांनाही जखमी अवस्थेत कारचालकाने घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांच्या मदतीने स्वतःच्या गाडीतून साटेली- भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले; तथापि उपचारापूर्वीच सुमित याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने कालकुंद्री गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची नोंद दोडामार्ग पोलीस ठाण्यात झाली असून रात्री पंचनामा तर आज सकाळी १० वाजता शव विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गवस, वसंत देसाई होमगार्ड बाळकृष्ण जाधव करत आहेत.
सुमित हा मीनाताई ठाकरे हायस्कूल चे अध्यापक पी वाय पाटील यांचा मुलगा असून तो अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. आज दुपारी त्याच्यावर कालकुंद्री येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

No comments:
Post a Comment