शिवगर्जना सारखे इतिहास सांगणारे महानाट्य तरुणांमध्ये मुल्यशिक्षण रुजवितात-कुलगुरु डॉ.चासकर, सातवणेच्या राम गुरव चा केला सन्मान - चंदगड लाईव्ह न्युज

14 March 2024

शिवगर्जना सारखे इतिहास सांगणारे महानाट्य तरुणांमध्ये मुल्यशिक्षण रुजवितात-कुलगुरु डॉ.चासकर, सातवणेच्या राम गुरव चा केला सन्मान

शिवगर्जना नाटकामध्ये मुख्य शाहिरी भूमिका करणारे राम गुरव यांचा सन्मान करताना डॉ मनोहर चासकर
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
     शिवगर्जना सारखी महानाट्य इतिहास सांगण्याबरोबरच तरुण विद्यार्थ्यांमध्ये मुल्यशिक्षण रुजविण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतात, असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त केले.
      शिवगर्जना या महानाट्यातील दिग्दर्शक, कलावंत व तंत्रज्ञ यांनी नुकतीच स्वारातीम विद्यापीठास सदिच्छा भेट दिली. त्याप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलातील नाट्य व चित्रपट विभागाच्यावतीने शिवगर्जना या छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास सांगणाऱ्या महानाट्यातील निर्माता, दिग्दर्शक, तंत्रज्ञ व प्रमुख कलावंतांचा व संकुलातील विद्यार्थ्यांचा मुक्त संवाद या कार्यक्रमाचे ललित व प्रयोगजीवी कला संकुलात आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंदगड तालूक्यातील सातवणे गावचा सुपत्र व नाट्य कलाकार शाहिरी भूमिका करणाऱ्या राम गुरव यांचा खास गौरव करण्यात आला.
      याप्रसंगी नाट्य व चित्रपट विभागाचे संवादक प्रा. राहुल गायकवाड व प्रा. कैलास पुपुलवाड यांनी दिग्दर्शक, कलावंत व तंत्रज्ञांना बोलत करीत या संपूर्ण महानाट्याची निर्मिती प्रक्रिया उलगडली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर हे उपस्थित होते.
     या मुक्त संवादात महानाट्यातील कलावंतांनी निर्मिती प्रक्रिये दरम्यानच्या अनेक गंमती-जमती व महाराजांचे नाटक करीत असताना असलेली जबाबदारी व बांधीलकी यावर भाष्य केले. या मुक्त संवादात महानाट्याचे लेखक-दिग्दर्शक स्वप्नील यादव, निर्माता रेणू यादव, महाराजांची भूमिका करणारे विनायक चौगुले, जीजामाता दिपाली हांडे, शाहिर- निवेदक राम गुरव, अफजलखान साकारणारे शकिल पटेल, संतोष वडगीर आदी सहभागी झाले होते. यावेळी महानाट्यातील कलावंतांचा डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment